Mumbai News – पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रीकालीन ब्लॉक, एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आणि नायगाव स्थानकावर पादचारी पुलाचे गर्डर्स बसवण्यासाठी शनिवारी मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर रात्रीकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान सर्व जलद गाड्या धीम्या मार्गांवरून चालवल्या जातील. तसेच, भाईंदर आणि वसई रोड स्थानकांदरम्यानच्या सर्व डाऊन धीम्या गाड्या डाऊन जलद मार्गावरून चालवल्या जातील. ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवा रद्द करण्यात येतील. दरम्यान, रविवारी 17 मे 2026 रोजी दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.

दादर स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यान्वित करण्यासाठीचा ब्लॉक पाचव्या मार्गिकेवर तसेच अप आणि डाऊन जलद मार्गांवर 15 मे 2026 रोजी रात्री 23:00 वाजल्यापासून ते 16 मे 2026 रोजी सकाळी 6.00 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. तसेच, नायगाव स्थानकावर पादचारी पुलाच्या गर्डर्सचे दोन भाग बसवण्यासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पहाटे 1.00 ते 4.00 वाजेपर्यंत, तर अप आणि डाऊन जलद मार्गांवर पहाटे 2.30 ते 3.30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.

ब्लॉकमुळे एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होईल. गाडी क्रमांक 19016 पोरबंदर – दादर सौराष्ट्र एक्स्प्रेस 15 मे 2026 रोजी बोरीवली स्थानकावरच थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक 12927 दादर – एकता नगर सुपरफास्ट एक्सप्रेस 16 मे 2026 रोजी बोरीवली येथूनच आपला प्रवास सुरू करेल आणि 17 मे 2026 रोजी नियोजित वेळेनुसार मार्गस्थ होईल. गाडी क्रमांक 19003 दादर – भुसावळ खानदेश एक्सप्रेस 17 मे 2026 रोजी बोरीवली येथूनच आपला प्रवास सुरू करेल. गाडी क्रमांक 22946 ओखा – दादर सौराष्ट्र मेल 16 मे 2026 रोजी ओखा येथून 2 तास 15 मिनिटे उशिराने सुटेल आणि बोरीवली येथेच तिचा प्रवास समाप्त होईल.

गाडी क्रमांक 09052 भुसावळ – दादर स्पेशल 16 मे 2026 रोजी भुसावळ येथून एक तास उशिराने सुटेल. गाडी क्रमांक 12928 एकता नगर – दादर एक्सप्रेस 16 मे 2026 रोजी तिच्या मूळ स्थानकावरून 1 तास 30 मिनिटे उशिराने सुटेल. गाडी क्रमांक 14707 हनुमानगड – दादर एक्सप्रेस 16 मे 2026 रोजी सुरत आणि विरार दरम्यान 30 मिनिटे उशिराने धावेल. गाडी क्रमांक 22953 मुंबई सेंट्रल – अहमदाबाद गुजरात सुपरफास्ट एक्सप्रेस 17 मे 2026 रोजी मुंबई सेंट्रल येथून 30 मिनिटे उशिराने सुटेल.