
फॉरेक्स कंपनीच्या डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हचे अपहरण करून त्याच्याकडून 10 हजार अमेरिकन डॉलर्स लुटल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील दोन हवालदारांना अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. जुहू पोलिसांनी ही कारवाई केली. संदीप शिंदे आणि गजेंद्र राजपूत अशी अटक केलेल्या हवालदारांची नावे आहेत.
संदीप शिंदे हा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात तर गजेंद्र राजपूत हा जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. वांद्रे येथील एका फॉरेक्स कंपनीत काम करणारा तरुण विदेशी चलन पोहोचवण्यासाठी जुहूला गेला होता. शिंदे आणि राजपूत यांनी त्याचे अपहरण केले आणि त्याला धमकावून त्याच्याकडील 10,000 डॉलर्स (सुमारे 8.3 लाख रुपये) लुटले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुटलेली रोकड अद्याप हस्तगत करण्यात आलेली नाही. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर तीन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. जनतेचे रक्षक मानले जाणाऱ्या पोलिसांनीच अशा प्रकारे गुन्हेगारी कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


























































