
मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या सोडवायची असेल तर सर्व रस्ते सिमेंटकाँक्रीटचे बनवणे हाच उपाय आहे. कारण डांबरी रस्त्यांचा खरा शत्रू पाणी असते. मुंबईत पाणी मोठ्या प्रमाणावर साचते. मुंबईतील ड्रेनेज सिस्टीमदेखील अत्याधुनिक केली पाहिजे. समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प उभारल्यास मुंबईचा समुद्र माँरिशससारखा सुंदर होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दसऱ्या टर्मचे शंभर दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत नितीन गडकरी यांनी शंभर दिवसांत विकासाचे कोणते मोठे निर्णय घेण्यात आले याची माहिती दिली.
चीनसह जगभरात मंदीची लाट आहे. हिंदुस्थानात वाहननिर्मिती क्षेत्रात त्याचे प्रतिबिंब उमटले असले तरी त्यावर तोडगा काढण्यात येत आहे. मात्र इतर क्षेत्रांत मंदी नाही. ‘कही खुशी, कही गम’ हे प्रत्येक बाबतीत चालतेच. पण रोजगार निर्मिती हीच मोदी सरकारची कायम प्राथमिकता राहील, असे ते म्हणाले.
विकासकामांना पुरेसा निधी
नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या मार्फत सुरू असणाऱ्या रस्त्यांच्या बांधकामांना निधी नाही ही वस्तुस्थिती नाही असे स्पष्ट करीत नितीन गडकरी म्हणाले की, मार्चअखेरपर्यंत 5 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. 30 कि.मी. प्रतिदिन रस्ते उभारणीचा वेग 40 कि.मी. प्रतिदिन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी आणि केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी तर आपल्याला कामांचा वेग आणखीन वाढवा, निधीची कोणतीही कमतरता भासणार नसल्याचे आश्वासन दिल्याचे गडकरी म्हणाले.
मेट्रो कारशेडचे समर्थन
आरेमधील मेट्रो कारशेडच्या वृक्षतोडीला विरोध होत असल्याकडे पत्रकारांनी गडकरी यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, विकास आणि पर्यावरण यांचा निश्चितच समतोल राखला पाहिजे या मताचा मी आहे. 1996-98च्या काळात राज्यात पूल बांधले, वांद्रे-वरळी सीलिंकचे काम सुरू केले तेव्हाही असाच विरोध झाला होता. या विरोधामुळे 420 कोटींचा प्रकल्प 1800 कोटींपर्यंत पोचला. महाराष्ट्र सरकारने वृक्षलागवडीत देशातच नाही तर जगात नोंद होईल असे काम केले आहे. वृक्षतोड केली तर ती इतरत्र लावण्याचा पर्याय उपलब्ध असतोच. पण प्रकल्पालाच विरोध होऊ नये असे सांगताना मेट्रो कारशेडच्या कामाचे त्यांनी समर्थन केले.
मलाही दंड भरावा लागला
भरधाव गाडी चालवल्याप्रकरणी मला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनाही दंड भरावा लागला आहे, असे नितीन गडकरी यांनी नव्या वाहतूक कायद्याच्या अंमलबजावणीबाबत माहिती देताना सांगितले. ते पुढे म्हणाले, देशात दीड लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. लाखो लोक दिव्यांग बनतात. मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये 18 ते 35 वयोगटातील तरुणांची संख्या 65 टक्के आहे. त्यामुळे दंडापेक्षा मानवी जीवन महत्त्वाचे आहे. तसेच या कायद्याचा उद्देश दंड वसुलणे हा नाही. जे नियम पाळतात त्यांना दंडाची भीतीच नाही. ई-वाहन नावाच्या ऍपच्या माध्यमातून तर आता वाहनविषयक सर्व कागदपत्रे डिजिटलाईज करण्याची सोय आहे. त्यामुळे ती सोबत बाळगण्याचीही गरज नाही. वाहतूक पोलिसाने अडवल्यावर त्याला फक्त मोबाईल दाखवावा लागणार आहे. तसेच 100 रुपये दंडाची रक्कम ही 30 वर्षांपूर्वी ठरवण्यात आली होती याकडे त्यांनी लक्ष वेधले.




























































