उत्तर-पश्चिम मतदारसंघात महायुतीचीच लाट

20

सामना प्रतिनिधी। मुंबई

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात अखेर काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचे घोडे गंगेत न्हाले खरे, पण माजी खासदार दिवंगत गुरुदास कामत समर्थकांनी निरुपम यांच्याविरोधात असहकाराचा शड्डू ठोकला आहे. त्यामुळे ‘बिना बाराती, निकला दुल्हा शादी कराने’ अशी काँग्रेस उमेदवाराची इथे अवस्था झाल्याचे चित्र आहे. शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी प्रचारफेऱया, कॉर्नर बैठका, कार्यकर्ता सायकल रॅली अशा उपक्रमांचा धडाका लावत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. त्यातच काँग्रेसला उघड पाठिंबा देण्याच्या मनसेच्या भूमिकेला इथे मात्र मनसेचेच कार्यकर्तेच विरोध करीत आहेत. संजय निरुपम यांनी आपल्या नेत्यांचा केलेला अपमान ते आजही विसरलेले नाहीत.

जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव, दिंडोशी, अंधेरी आणि वर्सोवा अशा सहा विधानसभा मतदारसंघांत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी केलेल्या विकासकार्यांमुळे या मतदारसंघात महायुतीची भगवी लाट पसरलेली दिसत आहे. शिवसेना आमदार सुनील प्रभू, रमेश लटके, राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि भाजपचे आमदार राज्यमंत्री विद्या ठाकूर, अमित साटम, भारती लव्हेकर यांनी महायुतीच्या प्रचाराचे रान उठवले आहे. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासह देशभरात पेटवलेले देशभक्तीचे ‘स्फुल्लिंग शिवसेना -भाजप उमेदवारासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यास फायदेशीर ठरले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या