मुंबई पोलिसांचे ब्लॉक-अनब्लॉक, अभिनेत्रीची गृहमंत्र्यांकडे धाव

67

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजा राममोहन रॉय यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारी अभिनेत्री पायल रोहतगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पायल रोहतगी हिने ट्वीट करत मुंबई पोलिसांनी आपल्याला ट्विटरवर ब्लॉक केला आहे. तसेच मुंबई पोलिसांची तक्रार तिने गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.

पायल रोहतगी हिने ट्विटरवर मुंबई पोलिसांनी ब्लॉक केल्याचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. मुंबई पोलिसांनी मला का ब्लॉक केले आहे, असा सवालही तिने उपस्थित केला आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या या पक्षपातीपणानंतर मला हिंदुस्थानमध्ये राहण्यास भिती वाटत असल्याचेही तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच तिने याची तक्रार गृहमंत्र्यांकडे केली आहे.

पायलने अमित शहा यांना पाठवलेल्या मेलचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. यात तिने सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली असून त्रास दिल्याबद्दल शहा यांची माफीही मागितली आहे. मुंबई पोलिसांनी माझे व्हेरिफाईन अकाऊंट ब्लॉक केल्याची माहिती मिळाली. हे आश्चर्यकारक आहे, असेही तिने यात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे एजाज खान नावाच्या एका कलाकाराने माझ्याविरोधात चुकीची विधानं केली तेव्ही मी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु आता या प्रकाराकडे तुम्ही लक्ष देताल अशी आशा आहे, असे पायलने शहांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी पायल रोहतगीला अनब्लॉक केल्याचे ट्वीट केले आहे. तसेच या प्रकाराचा टेक्निकल टीम शोध घेत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या