मुंबईत अकरा महिन्यांत चार हजार सायबर गुन्हे, दिवसाला दहा गुन्हे होतात नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश सौंदाळकर

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सायबर गुह्यांचा आलेख वाढत चालला आहे. गेल्या अकरा महिन्यांत मुंबईत सायबरचे 3 हजार 960 गुन्हे दाखल आहेत. क्रेडिट कार्ड, वीज बिल, लोनच्या नावाखाली आणि सेक्सटॉर्शन करून नागरिकांकडून लाखो रुपये उकळले जात आहे. सर्वाधिक गुन्हे पश्चिम उपनगरांत झाल्याची नोंद आहे.

माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात सायबर ठग हे इंटरनेटचा वापर करून गुन्हे करत आहेत. सायबर ठग हे विविध आयडिया करून नागरिकांची फसवणूक करतात. ऑनलाइन गुन्हे रोखण्यासाठी पोलीस जनजागृती करतात. तरीदेखील ठग हे नागरिकांना कधी बँकेच्या नावाने तर कधी वीज बिलाच्या नावाखाली बँक खात्यावर डल्ला मारतात. सायबर ठग हे नोकरदार आणि बेरोजगार यांना टार्गेट करून त्यांची बँक खाती रिकामी करतात. सध्या any desk अॅप्सचा वापर नोकरीच्या नावाखाली, लोन आणि वीज बिलाच्या नावाखाली फसवणुकीचे गुन्हे मुंबईत घडत आहेत. मुंबईत गेल्या अकरा महिन्यांत सायबरचे सुमारे 3 हजार 960 गुन्हे दाखल आहेत. कस्टमचे 66, खरेदीचे 154, विमा पंपनी आणि पीएफचे 16 गुन्हे दाखल असून दोन गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

खास करून बनावट वेबसाईट तयार करून नागरिकांना फसवले जाते. त्या वेबसाईटमध्ये किंचित बदल केला जातो. तो बदल सहसा लवकर कोणाच्या लक्षात येत नाही. बनावट वेबसाईटचे 47 गुन्हे दाखल असून पोलिसांनी 3 गुह्यांची उकल करून चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ठग हे गुंतवणुकीच्या नावाखालीदेखील चुना लावतात. मुंबईत गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याचे 24 गुन्हे असून त्यात 4 जणांना जेरबंद केले आहे. तसेच सध्या क्रिप्टो चलनाच्या नावाखालीदेखील नागरिकांची फसवणूक केली जाते. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा देऊ अशा भूलथापा मारतात. क्रिप्टो करन्सी फसवणुकीचे मुंबईत 16 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तीन गुह्यांची उकल करून पाच जणांना बेडय़ा ठोकल्या आहेत.

पश्चिम विभागात 1400, उत्तर विभागात 500, मध्य विभागात 746, पूर्व विभागात 477 आणि सायबरमध्ये 204 गुन्हे दाखल झाल्याची नोंद.
सायबरचे एकूण 3960 गुन्हे दाखल असून पोलिसांनी 243 गुह्यांची उकल करून 395 जणांना बेडय़ा ठोकल्या.
सायबर गुह्यांत अटक केलेल्यामध्ये परदेशी नागरिकाचादेखील समावेश

गोल्डन अवर्स ठरतो महत्त्वाचा

फसवणुकीच्या गुह्यांत गोल्डन अवर्स हा महत्त्वाचा असतो. नागरिक फसवणूक झाल्यानंतर तक्रार देण्यासाठी येतात. नुकतेच चारकोप येथील महिलेने ऑनलाईन कपडे मागवले होते. त्या कपडय़ांची ऑर्डर ट्रेस होत नसल्याने त्यांनी गुगलवर एक नंबर सर्च केला. त्यांना तेथे एक नंबर दिसला. ठगांनी महिलेला भूलथापा मारून तिच्या खात्यातून 93 हजार रुपये काढले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी वेळीच तपास करून फसवणूक झालेली रक्कम वाचवली.

मुंबई सायबर पोलीस हे आपल्या मदतीसाठी कायम तत्पर आहेत. आपण एखाद्या सायबर गुह्यास बळी पडल्यास आपण तत्काळ सायबर हेल्पलाइन 1930 ला संपर्क करा. आता ऑनलाइन कंप्लेंट दाखल करण्यासाठी आता www.cybercrime.gov.in हे पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. तिथे तत्काळ तक्रार करण्यात यावी. सायबर गुह्यात गोल्डन अवर्स महत्त्वाचा असतो. फसवणुकीचे प्रकार झाल्यावर 1930 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
– डॉ. बाळसिंग राजपूत, पोलीस उपायुक्त, सायबर, मुंबई

प्रकार                                   गुन्हे         गुह्याची उकल
फिशिंग/ ई-मेल स्फुफिंग               31              3
ओब्सेनस ई-मेल / एमएमएस        299             62
बनावट सोशल मीडिया प्रोफाइल     108             19
व्रेडिट कार्ड ऑनलाइन फसवणूक  1073             12
लोन फसवणूक                         96               5
सेक्सटॉशन                             65              14
इतर आयटी केसेस                   325             36