
मंत्रालयात दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे, पण दररोज येणाऱ्या चार ते साडेचार हजार व्हिजिटर्सपैकी सरासरी निम्मे लोक हवशे नवशे गवशे असे ‘बिनकामाचे’ असल्याचे धक्कादायक निरीक्षण पोलीस खात्याने नोंदवले आहे. दररोज न चुकता मंत्रालयात येणाऱ्यांची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा या व्हिजिटर्सना कोणतेही स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे आता मंत्रालयात येणारे बिनकामाचे लोक आणि दलाल पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
शिवाजी पार्कमधील एक महिला काही महिन्यांपूर्वी पोलिसांचा डोळा चुकवून मंत्रालयात घुसली. या महिलेने थेट सहावा मजला गाठला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाच्या बाहेर कुंडय़ांची तोडफोड केली. त्यानंतर मंत्रालयातील व्हिजिटर्सच्या प्रवेशावर निर्बंध आणण्याच्या हालचालींना सुरुवात झाली. त्यानंतर फेशिअल रेकग्निशन सिस्टम आणि आरएफआयडी कार्डची यंत्रणा सुरू झाली.
आता तर मंत्रालयात येणाऱ्या मोटारी आणि अनावश्यक व्हिजिटर्सच्या संख्येवर अधिक कठोरपणे निर्बंध येणार आहेत. मंत्रालयात आरएफआयडी यंत्रणा आणल्यानंतर रोजच्या व्हिजिटर्सची संख्या किती आहे यावर पोलीस विभागाने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली तेव्हा व्हिजिटर्सची धक्कादायक आकडेवारी पुढे आली.
कॅबिनेटच्या दिवशी आठ ते नऊ हजार व्हिजिटर्स
मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक असल्यावर आठ ते नऊ हजार व्हिजिटर्स येतात. इतर दिवशी चार ते साडेचार हजार व्हिजिटर्स येतात असे आढळून आले आहे. या वाढत्या संख्येमुळे पोलिसांचा ताप वाढतोच; पण मंत्रालयातील पॅण्टीन, स्वच्छतागृह व इतर यंत्रणेवर ताण पडतो. सर्वाधिक ताण मंत्रालयाच्या लिफ्टच्या यंत्रणेवर पडतो.
सर्वाधिक गर्दी नगरविकास विभागात
व्हिजिटर्स कोणत्या विभागात अधिक जातात याचीही गृह विभागाने तपासणी केली तेव्हा नगरविकास, महसूल व गृह विभागात सर्वात जास्त लोक येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दररोज येणाऱ्या व्हिजिटर्सना मंत्रालयातून फोन करून कोणत्या स्वरूपाचे काम आहे याची चौकशी केली असता त्यांना कोणतेही ठोस उत्तर देता आले नाही.
पोलिसांचा आता वॉच
मंत्रालयात वारंवार येणाऱ्या लोकांवर आता पोलीस वॉच ठेवणार आहेत. मंत्रालयात दररोज अनेक दलालांचा राबता असतो. या दलालांचा तळमजल्यापासून अगदी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत मुक्त संचार असतो असे लोक आता पोलिसांच्या रडारवर येणार आहेत.