पोलिसांच्या कोंबड्यांवर खात्यानेच सुरी फिरवली, पोलीस ठाण्यात मटणाचा ‘प्रसाद’ वाटू नका!

75
gatari

सामना प्रतिनिधी । मुंबई

येणाऱ्या बुधवारपासूनच आषाढी अमावस्या अर्थात गटारी कशी साजरी करायचे याचे प्लॅनिंग सुरू होईल. सामिष भोजनाचे बेत आखले जातील. सर्वसामान्यांप्रमाणेच पोलीसही दणक्यात गटारी साजरी करतात. अर्थात ही विश्वसनीय माहिती पोलीस खात्यानेच एका आदेशाद्वारे दिली आहे. याच विश्वसनीय माहितीच्या आधारे आयुक्तांनी पोलिसांच्या कोंबडय़ांवरच गटारीआधी सुरी फिरवली असून पोलीस ठाण्यात मटणाचा प्रसाद वाटू नका, असे सक्त आदेशच त्यांनी दिले आहेत.

कायदा व सुव्यवस्थेच्या सहपोलीस आयुक्तांनी आज आदेश देताना पोलीस ठाण्यातील गटारीवर बंधने आणली आहेत. बृहन्मुंबईतील पोलीस ठाणी/ शाखा/ कार्यालये इत्यादी ठिकाणी आषाढी अमावस्या/गटारी साजरी करण्याची प्रथा असल्याचे विश्वसनीयरीत्या कळते याची जाणीवही या आदेशात करून देण्यात आली आहे.

आयुक्तांनीच अशा तऱहेने पोलिसांच्या कोंबडय़ांवर सुरी फिरवली आहे. त्यामुळे या आदेशाचे पालन करत कोंबडय़ा-बकऱयांचा बळी जाणार नाही की जाणार हे आता येणाऱया बुधवार, शुक्रवार, रविवार आणि अखेरचा बुधवार या दिवशीच स्पष्ट होईल.

कोंबडय़ा किंवा बोकडांच्या बळी देण्याच्या प्रथेस ‘प्राणी संरक्षण संघटनांकडून’ विरोध होण्याची दाट शक्यता आहे.

पोलीस दल हे समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करीत असल्याने पोलिसांनी स्वतः कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे.

पोलीस ठाणे/शाखा/ कार्यालयांच्या प्रभारी अधिकाऱयांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांना प्राणी संरक्षण कायद्यातील प्रचलित तरतुदींची माहिती करून देणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे सहआयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

पोलीस ठाण्यात गटारी कशासाठी? आदेशात काय म्हटलेय वाचा…
गटारी साजरी करण्यामागे सर्वसाधारण असा समज आहे की,
पोलीस ठाणी/ कार्यालयांच्या हद्दीत काही व्यक्ती अपघातात किंवा हत्येत मृत्युमुखी पडतात. कोंबडय़ा किंवा बोकडांचा बळी दिल्यामुळे अशा मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या आत्म्यांना शांती लाभते अशी अंधश्रद्धा असल्याने कोंबडय़ा किंवा बोकडांचा बळी देण्याची प्रथा आहे.
बळी दिलेल्या कोंबडय़ा किंवा बोकडांचे जेवण तयार करून पोलीस ठाणी/शाखा/ कार्यालयांतील कर्मचारीवर्गास ‘प्रसाद’ म्हणून वाटण्यात येतो.

आपली प्रतिक्रिया द्या