
सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱया मुंबईकरांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6पर्यंत जमावबंदी असल्याने चारपेक्षा अधिक जणांना एकत्र येऊन सेलिब्रेशन करता येणार नाही. गच्चीवरच्या पार्ट्यांवर पोलिसांची नजर असणार आहे. 31 डिसेंबरच्या रात्री सुरक्षेसाठी सुमारे 35 हजार पोलीस हे रस्त्यावर तैनात असून ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवून असणार आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी गेट-वे आणि चौपाटय़ांवर होणारी आतिषबाजी पाहण्यासाठी मुंबई, ठाणे, पनवेल, विरार, पालघर येथून नागरिक येत असतात. डोक्यावर नाताळ बाबाची टोपी, विविध प्रकारचे फॅन्सी चष्मे घालून तरुणाई मरीन ड्राइव्हवर सेल्फी काढायची.
पूर्वी 31 डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशनसाठी हॉटेल्स, बार पहाटे साडेपाचपर्यंत खुले असायचे. हॉटेलप्रमाणे गल्लीबोळात तरुण मंडळी मद्याचे पेग रिचवत मटणावर ताव मारून डी.जे. आणि पारंपरिक वाद्यावर सेलिब्रेशन करायची. पण यंदा कोरोनामुळे मुंबईकरांना सेलिब्रेशन करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे.
मुंबईत जमावबंदी असल्याने चारपेक्षा अधिक जणांना एकत्र जमता येणार नाही. सध्या शहरात 11पर्यंत बार खुले ठेवण्यास मुभा आहे. त्यामुळे नववर्षाच्या निमित्ताने बारमध्ये होणाऱया पाटर्य़ा रात्री अकराच्या आतच आटपाव्या लागणार आहेत. रात्री 11नंतर डिस्को आणि पब्ज बंद असणार आहेत.
महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडू नयेत म्हणून साध्या वेशात पोलीस तैनात असतील, असे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.
मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी त्या रात्री सुमारे 35 हजार पोलीस हे रस्त्यावर तैनात असणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून पोलीस नजर ठेवतील.
मुंबईकर हे गेट वे, गिरगाव, मरीन ड्राइव्ह, दादर, जुहू, मढ चौपाटय़ांवर जाऊ शकतात. पण चारपेक्षा अधिक जण एकत्र आल्यास कारवाई होईल.
31 डिसेंबरच्या रात्री आणि 1 जानेवारीच्या पहाटे दारू पिऊन वाहन चालवणाऱया मद्यपी चालकांवर कारवाई केली जाणार आहे. कारवाईसाठी 39 ठिकाणी वाहतूक पोलिसांची नाकाबंदी असणार आहे. यंदा कोरोनामुळे ब्रिथ अनालायझरद्वारे मद्यपी चालकांची चाचणी केली जाणार नाही. पण जे दारू पिऊन वाहने चालवतील अशांना वाहतूक पोलिसांनी पकडल्यास त्यांना जवळच्या रुग्णालयात नेऊन त्यांची रक्त तपासणी केली जाईल. दोषी चालकावर कारवाई करणार असल्याचे सहपोलीस आयुक्त (वाहतूक) यशस्वी यादव यांनी सांगितले.































































