
भाजपच्या नूपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चौकशीसाठी हजर राहण्याकरिता पायधुनी पोलिसांनी नूपुर यांना नोटीस बजावली आहे.
एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात नूपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या बाबत संतापजनक टिपण्णी केली होती. त्यानंतर त्याचे संतप्त पडसाद सर्वत्र उमटले. याप्रकरणी पायधुनी पोलीस ठण्यात नूपुर शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पायधुनी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी नूपुर यांना चौकशीसाठी बोलावले आहे. 25 जून रोजी सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यात हजर रहावे असे नोटिसीतून नूपुर यांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्यभरात नूपुर शर्मा यांच्या निषेधार्थ मुस्लिम संघटनांकडून आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली असल्याचे सांगण्यात येते.






























































