
मुंबई पोलीस संघाने एव्हरग्रीन स्पोर्टस् क्लब संघाविरुद्ध निर्णायक विजय मिळवत संतोषकुमार घोष ट्रॉफी या 16 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपदाचा मान मिळवला. डावखुरा फिरकी गोलंदाज झेनिथ सचदेव हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सामन्यात 9 बळी मिळवत त्याने अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आतिफ खान (262 धावा आणि 9 बळी) याला तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून सुमित मिश्रा (282 धावा, एव्हरग्रीन स्पोर्टस् क्लब) याला आणि सर्वोत्तम गोलंदाज म्हणून झेनिथ सचदेव (4 सामन्यांत 26 बळी) याला गौरविण्यात आले.
हिंदुस्थानचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर तसेच मुंबईच्या रणजी संघाचे निवड समिती सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी एमसीएचे सदस्य उन्मेष खानविलकर, एमसीएचे सचिव संजय नाईक, स्पर्धा सचिव अभय हडप आणि आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक जयदीप पाल, शिवाजी पार्क जिमखान्याचे उपाध्यक्ष दीपक मुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
‘सागर सान्निध्य प्रीमियर लिग’ क्रिकेट स्पर्धेत एसएस वॉरिअर विरुद्ध एसएस पायरेट्स या संघांमध्ये झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात विजयी ठरलेल्या एसएस वॉरिअर संघाचा कर्णधार महेश तरे याला नगरसेवक मिलिंद वैद्य यांच्या हस्ते रोख पारितोषिक व चषक प्रदान करण्यात आला. यावेळी शाखाप्रमुख अभय तामोरे, शाखा समन्वय मिलिंद तांडेल, विनायक आक्रे, समाजसेवक पांडुरंग माने व भूषण पाटील. यावेळी उपशाखाप्रमुख जोगेश तरे, संतोष सुर्वे, नागेश पाटील, माजी महिला शाखा समन्वय मालती धनू आदी मान्यवर उपस्थित होते.लालबाग गणेश गल्ली येथे शिवसेना वॉर्ड क्रमांक 204 अंतर्गत शाखाप्रमुख किरण तावडे यांच्या गौरवार्थ केटीपीएल 2020 ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती.



























































