
सामना प्रतिनिधी । मुंबई
पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी आता लाकडी बाकांऐवजी ‘पॉलीमर’चे आकर्षक रंगीबेरंगी डेस्क-बेंचेस वापरले जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार इयत्तांसाठी चार प्रकारचे डेक्स-बेंचेस आणले जाणार आहेत. या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे वृक्षसंवर्धनाला चालना मिळणार आहे.
पालिका शाळांमध्ये सध्या लाकडी डेस्क-बेंचेस वापरले जातात, मात्र पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एकाच आकाराची बाकडी असल्याने मोठय़ा विद्यार्थ्यांना बसणे-अभ्यास करण्यासाठी गैरसोय होते. याशिवाय शालान्त परीक्षेकरिता पालिकेच्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र म्हणून वर्गखोल्या उपलब्ध करून देत असताना परीक्षार्थींची गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर पालिका शाळांमध्ये 2018-2019 करिता पहिली-दुसरीकरिता ‘ए’ टाइप (लहान), तिसरी-चौथीकरिता ‘बी’ टाइप (मध्यम आकार), पाचवी-सहावीसाठी ‘सी’टाइप (थोडे मोठे) आणि सातवी-आठवीकरिता ‘डी’ टाइप (मोठे) आकाराचे 8995 ‘पॉलीमर’चे डेस्क-बेंचेस खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी पालिका आयुक्तांची मंजुरी प्राप्त झाली असून निविदा कार्यवाही मध्यवर्ती खरेदी खाते, भायखळा यांच्या माध्यमातून अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सर्व शाळा, खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकरिता सुसज्ज आसनव्यवस्था निर्माण करावी अशी मागणी भाजपच्या नगसेविका आशा मराठे यांनीदेखील केली होती.


























































