Lok Sabha Election 2024 : मुंबईत पवई हिरानंदानीमध्ये मतदानाचा खोळंबा; EVM बंद पडल्याने आदेश बांदेकर यांचा संताप

मुंबईत संथ गतीने सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेवरून आणि असुविधांवरून मतदार आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मतदान केंद्रांवरील गैरसोयीवरून निवडणूक आयोगाच्या ढिम्म कारभारावर सडकून टीका केली आहे. आता मुंबईतील पवई हिरानंदानी भागात दोन ते तीन तासांपासून मतदान खोळंबल्याने शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

पवई हिरानंदानी भागात दोन-तीन तासांपासून मतदान खोळंबलं आहे. EVM बंद पडल्याने हा खोळंबा झाला. आता बंद पडलेलं EVM बदलल्यानंतरही मतदान सुरू झालेलं नाही. त्यातच शिंदे गटाचे नेते दिलीप लांडे यांना आत सोडल्यानं संताप व्यक्त करण्यात येत आहे. लांडे यांना आत सोडलंच कसं? असा सावल करत शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी आक्षेप घेत आपला संताप व्यक्त केला आहे.

पवईत EVM बंद असल्याची तक्रार अभिनेते आणि शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) सचिव आदेश बांदेकर यांनी दुपारी 12 वाजता केली होती. त्यानंतर जवळपास तासाभराने EVM बदलल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. मात्र त्यानंतर एक तास उलटूनही मतदान सुरू झालेलं नव्हतं. आदेश बांदेकर, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर, दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह 100 हून अधिक मतदार यामुळे खोळंबले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

काय म्हटले आदेश बांदेकर?

आंदेश बांदेकर यांनी मतदान केंद्रजवळच्या गर्दीचा आणि मतदान खोळंबल्याचा एक व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे. या व्हिडिओत आदेश बांदेकर यांनी मतदारांशीही संवाद साधला. यात मतदारांनीही गैरसोयीवरून टीका केली आहे. दोन-तीन तासांपासून मतदान केंद्रावर खोळंबून असल्याचे सांगत अनेक मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. काही मतदार तर चार तासांपासून रांगेत उभे आहेत. तरीही मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडून कुठलीही पुढील कार्यवाही करण्यात आलेल नाही, असं महिला मतदारांनी सांगितलं.

मी पवई मतदान केंद्रावर आहे. हिरानंदानीसारखा हा सुशिक्षित भाग आहे. या ठिकाणी सर्वांची प्रतिक्रिया पाहिली तर एकंदरी 58, 57 ही जी मुख्य यादी आहे, त्या सगळ्या बंद झालेल्या आहेत. सगळ्या मशिन बंद आहेत. इथे अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे. हिरानंदानी फाउंडेशन स्कूलच्या ठिकाणी बऱ्याचशा मशिन बंद पडल्या आहेत. इथे मतदानासाठी सकाळापासून अनेक लोक रांगेत उभे आहेत. ज्येष्ठ नागरीक तर मतदान न करताच परतली आहेत. तीन-तीन तास वाट पाहून अनेक मतदार मतदान न करताच परतले आहेत. तीन तास झाले मतदार रांगेत उभे आहेत. आणि कुठल्या पद्धतीचं काम होत नाहीये, असं आदेश बांदेकर म्हणाले. तर झोनल अधिकारी अश्विनी मॅडमही कुठे दिसत नसल्याचं मतदारांनी सांगितलं.