
मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपात असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत उर्जामंत्र्यांनी व्यक्त केले आहे. त्याची दखल महाराष्ट्र सायबर सेलने घेतली असून मुंबई, ठाण्याला अंधारात लोटण्यासाठी कोणी वीज तंत्रणा हॅक केली होती का याचा तपास आता केला जाणार आहे.
देशातील सर्वच वीज कंपन्यांची यंत्रणा स्काडा सिस्टमद्वारे (सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा एक्विझेशन) चालते. ही अद्यावत टेक्निकल यंत्रणा असून ती सहजासहजी हॅक करणे शक्य नाही. पण याआधीही जगभरात वीज यंत्रणा हॅक करून वीज पुरवठा खंडित केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच राज्याच्या उर्जामंत्र्यांनी वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता बोलून दाखवली आहे. त्याचा विचार करता सोमवारी मुंबई, ठाण्याचा वीज पुरवठा बंद पाडण्यासाठी वीज यंत्रणा कोणी हॅक केली होती का, तसा काही प्रयत्न झाला याबाबतची पडताळणी सायबर सेल करणार आहे.
दरम्यान स्काडा सिस्टम रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे चालते. ती तांत्रिक दृष्टय़ा हॅक करणे कठीण आहे, ही यंत्रणा हॅक करण्यासाठी तांत्रिक दृष्टय़ा सक्षम हॅकर लागतो असे टेक्निकल आणि सायबर तज्ञ अंपुर पुराणिक यांनी स्पष्ट केले आहे.




























































