मुंबईतही कोरोना; घाबरू नका, पण काळजी घ्या – मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यापाठोपाठ मुंबईतही कोरोनाने शिरकाव केला आहे. महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या सहापैकी दोन रुग्णांचे ब्लड रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्यात काल पाच रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रुग्ण आढळल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असून मुंबईकरांसह राज्यातील जनतेने घाबरू नये, पण काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका सज्ज असून विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत.

दुबईहून आलेल्या पुण्यातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर त्यांच्यासोबत दुबईला गेलेल्या 40 सहप्रवाशांचा शोध घेण्यात येत होता. या सहप्रवाशांपैकी सहा जणांवर मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील दोघे पॉझिटिव्ह तर चार जणांचे ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

‘कोरोना’चा सामना करण्यासाठी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात 28 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय आता ‘कोरोना’ची रक्तचाचणी कस्तुरबा रुग्णालयातही होत आहे. शिवाय आपत्कालीन स्थितीसाठी पालिकेच्या महत्त्वाच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार ठेवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शिवाय पालिकेने राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष सज्ज ठेवले असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

कर्नाटकात कोरोनाच्या संशयित रुग्णाचा मृत्यू

कर्नाटकातील कलबुर्गी येथे कोरोनाचा संशयित रुग्ण असलेल्या ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मोहम्मद हुसैन सिद्दीकी असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी बंगळुरूला पाठविण्यात आले आहेत. तेथून अहवाल आल्यानंतरच हुसैन यांचा मृत्यू कोरोनाची लागण होऊन झाला की नाही हे स्पष्ट होणार आहे. सिद्दिकी हे सौदी अरेबियातून आले होते.

‘कोरोना’चे दोन्ही रुग्ण पुणे आणि सौदी येथे जाऊन आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी, तपासणी केली जात आहे. इतर लोकांना याची बाधा होऊ नये म्हणून पालिका सज्ज आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून महापौर चषक कबड्डी स्पर्धा रद्द केली आहे. कस्तुरबा रुग्णालयातील दोन्ही रुग्णांची परिस्थिती स्थिर आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पालिकेने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. – किशोरी पेडणेकर, महापौर

कोरोनाची काहीही लक्षणे आढळून आल्यास लोकांनी किमान 14 दिवस घरात वेगळे राहावे. त्यामुळे या विषाणूची लक्षणे निघून जात असल्याची माहिती समोर आली आहे.

विधिमंडळ अधिवेशन शनिवारी संपणार

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन शनिवारी संपणार आहे. अर्थात त्याचा निर्णय विधिमंडळ घेईल. मात्र कोरोनाला घाबरून नव्हे, तर त्या त्या जिह्याचे, तालुक्यांचे अधिकारी, आमदार, पालकमंत्री त्यांच्या भागात असावेत आणि त्यांना तातडीच्या उपाययोजना करता याव्यात म्हणून हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने ‘महामारी’ घोषित केला

जगभर कहर माजवलेल्या आणि हिंदुस्थानात फैलावत चाललेल्या कोरोनाला बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘महामारी’ म्हणून घोषित केले. कोरोनाचा फैलाव धोकादायक पातळीवर पोहोचला आहे, असे नमूद करीत डब्ल्यूएचओने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

नाटय़संमेलन अडचणीत

राज्यात कोणतेही मोठे समारंभ घेऊ नये असा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतल्याने सांगलीत होणारे शंभरावे नाटय़संमेलन अडचणीत आले आहे. सरकारकडून अद्याप कोणतीही सूचना आलेली नाही. त्यामुळे संमेलन होणारच अशी भूमिका मात्र नाटय़ परिषदेने घेतली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील तपशील सांगितला. राज्यात गर्दी होईल असे कोणतेही समारंभ घेऊ नये. आरोग्य विभागानेही तशा कडक सूचना केल्या आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे टोपे म्हणाले.

गर्दी टाळा, मास्क लावून फिरण्याची गरज नाही

कोरोनामुळे घाबरून जाण्याचे कारण नसून मोठे सभा-समारंभ टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, मास्क लावून फिरण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज विधिमंडळात दिवसभर आढावा बैठका घेतल्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. संध्याकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पत्रकार परिषद घेतली आणि माहिती दिली.