एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पाच ठार, खालापूर टोलनाक्याजवळ कंटेनरची पाच गाड्यांना धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खालापूर टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना मध्यरात्री घडली. पुणे येथून मुंबईच्या दिशेने येणाऱया भरधाव कंटेनरने पाच वाहनांना अक्षरशः चिरडले. या अपघातात नवी मुंबई महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे यांचे कुटुंबच संपले. पाच जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना पनवेल आणि नवी मुंबई येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पुणे येथून मुंबईच्या दिशेने येत असलेला कंटेनर मध्यरात्री एकच्या सुमारास एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोलनाक्याजवळ आला असता कंटेनरचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे पुढे चाललेल्या दोन्ही कारवर हा कंटेनर जोरात आदळला. यात दोन्ही कारचा अक्षरशः चंदामेंदा झाला. या अपघातात डॉ. वैभव झुंजारे (41), त्यांची आई उषा झुंजारे (63), पत्नी वैशाली झुंजारे (38), मुलगी श्रेया झुंजारे (5) आणि गोरेगाव येथे राहणाऱया मंजू नाहर यांचा जागीच मृत्यू झाला तर स्वप्नील कांबळे (30), प्रकाश नाहर (65), अर्णव झुंजारे (11), किशन चौधरी आणि काळूराम जाट हे गंभीर जखमी झाले.

आणखी एक अपघात होता होता टळला

या अपघातातील जखमींना पोलीस आणि अन्य कर्मचारी मदत करीत असताना आणखी एका कंटेनरचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे बॅरिकेड्स तोडून सुमारे 50 मीटर पुढे आला. सुदैवाने हा कंटेनर एका झाडाला अडकल्यामुळे दरीत कोसळता कोसळता वाचला. त्यामुळे बचावकार्य करणाऱयांचे प्राण वाचले. जर हा कंटेनर सरळ आला असता तर बचावकार्य करणाऱयांच्या जिवावर बेतले असते.

कोरोना योद्धय़ाचा कुटुंबासोबतचा प्रवास अखेरचा ठरला

कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर नवी मुंबईत रुग्णांची संख्या विजेच्या वेगाने वाढू लागली. त्यामुळे रुग्णवाहिका कमी पडू लागल्याने एकच गोंधळ उडाला. त्यावेळी प्रशासनाने डॉ. वैभव झुंजारे यांच्याकडे रुग्णवाहिकांचे नियोजन करण्याची जबाबदारी दिली. त्याचवेळी कोविड सेंटरला आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य आणि औषधे पुरवण्याचे कामही त्यांच्यावर सोपवण्यात आले. ही जबाबदारी महत्त्वाची असल्यामुळे त्यांना दररोज कोविड सेंटरला भेट द्यावी लागत होती. याचा त्रास आपल्या कुटुंबाला होऊ नये यासाठी त्यांनी पत्नी वैशाली, मुलगा अर्णव आणि मुलगी श्रेया यांना आपल्या सोलापूरमधील मूळ गावी पाठवले. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वतःला झोकून दिले.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

वैभव झुंजारे आणि त्यांच्या कुटुंबाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त नवी मुंबईत कळताच नेरुळ येथील सेक्टर 15 सह महापालिका मुख्यालयावर शोककळा पसरली. वैभव झुंजारे, त्यांची आई, पत्नी आणि मुलीच्या र्पाथिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोरोनाची लागण झाली

कोरोनाविरुद्धच्या युद्धामध्ये पहिल्या फळीत लढत असताना डॉ. झुंजारे यांना कोरोनाची लागण झाली. मात्र कोरोनावर त्यांनी मात करून पुन्हा नव्याने आपली जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात केली. कोरोना महामारीमध्ये त्यांनी साप्ताहिक आणि इतर कोणतीही सुट्टी न घेता नॉनस्टॉप काम केले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कुटुंबाला आणण्यासाठी ते गावी गेले होते. पुन्हा नवी मुंबईत परतत असताना हा अपघात घडला आणि कुटुंबासोबतचा त्यांचा प्रवास अखेरचा ठरला.