
स्टेशनवरील गर्दी रोखण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली आहे. प्लॅटफॉर्म तिकीट आता दहा रुपयांवरून 50 रुपयांवर गेले आहे. देशातील 250 स्थानकांवर हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.
डेक्कन, प्रगतीसह 23 लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द
मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ या शहरांना जोडणाऱया 23 लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द केल्या आहेत. त्यात डेक्कन एक्प्रेस, प्रगती, हावडा दुरांतो, नंदीग्राम एक्प्रेससह राजधानीचाही समावेश आहे. गर्दी कमी करणे आणि प्रवासी संख्या घटणे ही दोन कारणे रेल्वेने दिली आहेत.
कोरोनाच्या प्रभावामुळे प्रवाशांच्या पुरेशा संख्येअभावी मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने मुंबई ते पुणे, नागपूर, हावडा आणि निजामुद्दीनला जाणाऱ्या 23 गाडय़ा पुरेसे भारमान नसल्याने रद्द केल्या आहेत. तर पश्चिम रेल्वेने 35 फेऱ्या कमी भारमानामुळे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ांची तिकिटे आरक्षित करणाऱ्या प्रवाशांनी त्यामुळे ‘रिफंड’ मिळण्यासाठी प्रवासी आरक्षण केंद्रांवर एकच गर्दी केली आहे.
मध्य रेल्वेने मुंबई ते पुणे धावणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस 19 ते 31 मार्चपर्यंत रद्द केली आहे. परतीची पुणे ते मुंबई डेक्कन क्वीन 18 ते 30 मार्चपर्यंत रद्द झाली आहे. एलटीटी ते अजनी एक्स्प्रेस 23 ते 30 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. परतीची अजनी ते एलटीटी एक्स्प्रेसही 20 ते 27 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. एलटीटी ते निझामाबाद एक्स्प्रेस 21 ते 28 मार्च बंद राहणार आहे. तर परतीची निझामाबाद ते एलटीटी एक्स्प्रेस 22 ते 29 मार्च बंद राहणार आहे. नागपूर ते रेवा एक्स्प्रेस 25 मार्च रोजी रद्द राहील. मुंबई ते नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस 23 मार्च ते 1 एप्रिल बंद राहणार आहे. परतीची नागपूर ते मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस 22 मार्च ते 31 मार्च रद्द राहणार आहे. पुणे ते नागपूर एक्स्प्रेस 26 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत रद्द राहील. परतीची नागपूर ते पुणे एक्स्प्रेस 20 ते 27 मार्च रद्द असेल. पुणे ते अजनी एक्स्प्रेस 21 ते 28 मार्चपर्यंत रद्द असेल. परतीची अजनी ते पुणे एक्सप्रेस 22 ते 29 मार्चपर्यंत रद्द असेल. मुंबई ते पुणे प्रगती एक्स्प्रेस, भुसावळ ते नागपूर, कलबुर्गी ते सिकंदराबाद एक्सप्रेस, हावडा ते मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, सीएसएमटी ते निजामुद्दीन राजधानी 20, 23, 27 आणि 30 मार्च रोजी रद्द असेल तर परतीची निजामुद्दीन ते सीएसएमटी राजधानी 21, 24, 26 आणि 31 मार्च रोजी रद्द असेल.
प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी आता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 10 रुपयांवरून थेट 50 रुपये करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ आणि सोलापूर डिव्हिजनमध्ये पुढील सूचना मिळेपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 10 रुपयांऐवजी 50 रुपये आकारण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या 35 फेऱ्या रद्द
मुंबई सेंट्रल ते इंदोर दुरांतो एक्स्प्रेस, वांद्रे ते जामनगर हमसफर एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल जयपूर दुरांतो एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल ते न्यू दिल्ली दुरांतो, इंदोर ते पुरी हमसफर एक्स्प्रेस अशा 35 फेऱ्या 21 ते 2 एप्रिल दरम्यान रद्द केल्या आहेत.

























































