बापरे! मुंबईच्या डोक्यावर रेंगाळले एव्हरेस्टपेक्षा दुप्पट उंचीचे पावसाळी ढग

मुंबईत महिनाभरापूर्वी धुमशान घालणारा पाऊस महिनाभर गायब होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मुंबई परिसरात जोरदार बरसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी रात्री एवढा भयानक पाऊस पडलाच कसा याचे उत्तर हवामान तज्ञांनी दिले आहे. त्यावेळी मुंबईच्या डोक्यावर तब्बल 18 किलोमीटर उंचीचे पावसाळी ढग रेंगाळले होते, म्हणजे एव्हरेस्टपेक्षा दुप्पट उंचीचे. या ढगांनीच घात केल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. रविवारीही पावसाने उसंत घेतली नव्हती. पुढील 36 तास मुंबईसह कोकणासाठी धोक्याचे असून मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पाच तास पावसाचे धुमशान, मुंबईत आठ भागांत 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस

मुंबईत शनिवारी रात्री 11 ते रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पाच तासांत पावसाने अक्षरश: धुमशान घातले. या पाच तासांत दहिसर, चेंबूर, विक्रोळी, कांदिवली, मरोळ, बोरिवली, वरळी आणि फोर्ट परिसरात 200 मिमीपेक्षा जास्त तर उर्वरित केंद्रांवर प्रत्येकी 125.73 ते 199.86 मिलिमीटर इतका पाऊस कोसळला. पालिकेच्या आर-उत्तरमधील दहिसरमध्ये सर्वात जास्त म्हणजे 226.82 मिमी इतका पाऊस झाला. मुंबई महापालिकेच्या विविध ठिकाणच्या 60 स्वयंचलित हवामान केंद्रांवर पावसाची ही नोंद घेण्यात आली.

मुंबईत शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा, 24 विभाग कार्यालये, मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि 25 सहाय्यकारी नियंत्रण कक्ष, मुंबई अग्निशमन दल इत्यादी सर्व यंत्रणा रात्रभर अव्याहतपणे कार्यरत होती. त्याचबरोबर महापालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालये यांनादेखील खबरदारीची उपाययोजना म्हणून आवश्यक त्या कार्यवाहीसाठी तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर मुंबईतील विविध 60 ठिकाणी असणाऱया पालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रांवर पावसाची नियमित नोंद घेतली जात होती. स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे उपलब्ध होत असलेल्या पावसाच्या या आकडेवारीचे सातत्यपूर्ण विश्लेषण हे पालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षामध्ये करण्यात येत होते व त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनादेखील पालिकेच्या विभाग कार्यालयांना रात्रभर नियमितपणे देण्यात येत होत्या.

पाणी साचल्याने रेल्वे विस्कळीत, बेस्टने केला वाहतुकीत बदल

मुसळधार पावसामुळे मुंबई शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगरातील सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकलही काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मध्य आणि पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र धीम्या गतीने सुरू होती तर हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान, बेस्टनेही आपल्या अनेक मार्गात बदल करत अविरत सेवा सुरू ठेवली.

आपली प्रतिक्रिया द्या