रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा; सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी रणजी मोसमासाठी मुंबईचा क्रिकेट संघ सज्ज झालाय. मुंबई क्रिकेट निवड समितीने मंगळवारी मुंबईच्या संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व सोपवण्यात आले असून या संघामध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे व कसोटीपटू पृथ्वी शॉ यांचीही निवड करण्यात आली आहे.

अनुभवी यष्टिरक्षक आदित्य तरे याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. श्रेयस अय्यर व शिवम दुबे यांची हिंदुस्थानी संघात निवड झाल्यामुळे त्यांना या संघात स्थान मिळालेले नाही. अजिंक्य रहाणे आता थेट दोन महिन्यांनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार असल्यामुळे त्याचा मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे. मुंबईचा संघ सलामीला बडोद्याशी भिडणार असून ही लढत 9 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.

धवल, शार्दुलवर वेगवान गोलंदाजीची मदार

अनुभवी गोलंदाजांमुळे मुंबई संघाचे पारडे जड असणार आहे. धवल कुलकर्णी व शार्दुल ठाकूर यांच्यावर मुंबई संघाच्या वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे. सिद्धेश लाड पहिल्या लढतीला मुकणार आहे. त्याचे लग्न असल्यामुळे या लढतीत तो खेळू शकणार नाही.

मुंबईचा रणजी संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, जय बिस्ता, शुभम रांजणे, आकाश पारकर, सरफराज खान, शम्स मुलानी, विनायक भोईर, शशांक अतार्डे, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, एकनाथ केरकर.