
माजी सैनिकाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जवानांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. माजी सैनिकाचा मृत्यू कसा झाला? त्याचा शोध घेणे गरजेचे असून या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे असे स्पष्ट करत अटक पूर्व जामिनासाठी हायकोर्टात आलेल्या सहा जवानांचा अर्ज न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी फेटाळून लावला. आर्मीत भरती झालेले गणेश ठोकल ३१ जुलै २०२० रोजी निवृत्त झाले. काही महिन्यानंतर ते आपल्या मित्रांसह अलिबाग काशीद येथे पिकनिकला गेले. तेथे त्यांचा बुडून मृत्यू झाला. ७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी त्यांचा मृतदेह घरी आणण्यात आला. मात्र आपल्या पतीला उत्तमरीत्या पोहता येत असून त्यांचा बुडून मृत्यू होणे शक्य नाही. मृतदेह आणला तेव्हा त्यांच्या डोळ्याला आणि मानेला इजा झाली होती त्यामुळे त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा करत गणेश यांच्या पत्नीने मुरुड पोलीस ठाण्यात सहा जणाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यातील आरोपी भगवान याने आपल्या पतीकडून १ लाख रुपये घेतले असून त्या वादातूनच पती गणेशची हत्या करण्यात आल्याचा दावाही तिने केला आहे. या प्रकरणी आपल्याला अटक होऊ नये यासाठी सहा जणांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली.
























































