
विघ्नहर्ता गणरायाची वेगवेगळी रूपं सगळ्यांनाच आकर्षित करतात. कागद, कडधान्य, चॉकलेट्स अशा विविध वस्तूंपासून बाप्पाची मूर्ती साकारल्याचे आपण पाहिले आहे. परंतु बोरिवलीच्या ओमकार किबे या कलाकाराने चक्क रुबिक्स क्युबचा वापर करून पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती साकारली आहे.
रुबिक क्युब एक्सपर्ट असलेले ओमकार हे पेशाने दिग्दर्शक आणि डिजायनर आहेत. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. रुबिक क्युबचे कोडे ते अवघ्या 20 सेकंदात सोडवतात. मुलांना रुबिक क्युबचे धडे देण्यासोबत मेमरी चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रुबिक क्युब आणि मोसाईक आर्टची सांगड घालत त्यांनी बाप्पाची प्रतिकृती 6 बाय 8 फुटांची प्रतिकृती साकारली आहे. यासाठी त्यांनी 1280 क्युबचा वापर केला असून ही प्रतिकृती तयार करण्यासाठी त्यांना 12 दिवसांचा कालावधी लागला आहे.
रुबिक क्युबमुळे झटपट निर्णय घेण्याची क्षमता वाढते. रुबिक क्युबच्या स्पर्धांमध्येदेखील आता वाढ होतेय. त्यामुळे अधिकाधिक जणांना रुबिक क्युबची गोडी वाढावी यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे. पुढच्या वर्षी रुबिक क्युबपासून लालबागच्या राजाची प्रतिकृती साकारण्याची माझी इच्छा आहे, असे ओमकार यांनी सांगितले. मोसाईक आर्टवर्कचे प्रदर्शन भरवण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.



























































