
सामना प्रतिनिधी । शिर्डी
मुंबईहून शिर्डीला दिंडी घेऊन येणाऱ्या लाखो साईभक्तांच्या सोयीकरीता स्वतंत्र पालखी मार्गाचा विकास आराखडा तात्काळ तयार करण्याचे निर्देश व तातडीने काम सुरु करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याची माहीती साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.
डॉ.हावरे म्हणाले, जगभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र शिर्डी येथे श्री साईंच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त दररोज येतात. यामध्ये मुंबई येथून शिर्डीला येणाऱ्या पालख्या आणि पदयात्री यांची संख्या साडेचार लाखावर आहे. त्यातही तरुण साईभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तसेच मोठ्या संख्येने महिलाही या पालख्यांमध्ये सहभागी असतात. हे सर्व साईभक्त मुंबई-आग्रा मार्गे आणि घोटी-शिर्डी मार्गे पालखी घेऊन येत असतात. त्यामुळे या मार्गावरुन चालणे जिकरीचे व धोकादायक होते. महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक साईभक्तांनी आपला जीव गमावला आहे. नुकत्याच झालेल्या सिन्नर जवळील देवपूर गावाजवळील अपघातात मुंबईतील 5 साईभक्त दगावले व 21 हून अधिक भक्तांना दुखापत झाली. त्यानुसार अनेक साईभक्तांकडून स्वतंत्र पालखी मार्गाची मागणी सातत्याने होत आहे.
त्यानुसार श्री साईबाबा संस्थान साईभक्तांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करीत असून पालखी मार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन मुंबई पासून शिर्डीपर्यंत रस्त्याच्या कडेने चालण्यासाठी एक स्वतंत्र पालखी मार्ग तयार करणेबाबत विनंती पत्र दिले होते. त्यानुसार पाटील यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत तातडीने शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन स्वतंत्र पालखी मार्ग तयार करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजानिक बांधकाम विभागाला दिलेले असून काम तातडीने सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहेत.
या प्रस्तावित पालखी मार्गावर उन्हापासून संरक्षणासाठी वृक्षारोपण, मार्गालगत प्रत्येक 15 कि.मी.अंतरावर एक निवारा शेड्स (स्वच्छता व निवासाच्या सोयीनी युक्त) अशा विविध सोयी-सुविधा उपलब्ध करणेसाठी संस्थानच्या वतीने योग्य ते सहकार्य करण्यात येईल. हा पालखीमार्ग 250 कि.मी लांबीचा असून हा पालखीमार्ग मुंबईहुन शिर्डीला जाताना रस्त्याच्या उजव्याबाजूला राहणार आहे. हा मार्ग 15 फुट रुंदीचा व तो रस्त्यापेक्षा 1 फुट उंचीवर असणार आहे. जेणेकरुन त्यावर वाहने चढू शकणार नाही. या पालखी मार्गामुळे मुंबईहून शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांची पदयात्रा सुलभ व आनंददायी होणार असल्याचे सांगून चंद्रकांत पाटील व महाराष्ट्र शासन यांनी हा प्रश्न तातडीने सोडावल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन डॉ.हावरे यांनी त्यांचे आभार मानले.


























































