शिवजयंती अपूर्व उत्साहात आणि जल्लोषात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती गुरुवारी राज्यभरात अपूर्व उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. राज्यातील अनेक ठिकाणी शिवराय प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या पुतळय़ावर पुष्पवृष्टी करून अभिवादन केले. यावेळी युवासेना प्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते.

शिवप्रेमींसाठी गडकिल्ले बनविण्याची स्पर्धा यावेळी पार पडली. स्पर्धकांनी बनविलेल्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनालाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. परिवहनमंत्री ऍड. अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, उपाध्यक्ष अजित साळवी, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, आशीष चेंबूरकर, माजी नगरसेवक मनोहर पांचाळ आदी यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संजय कदम, संतोष कदम, राजा ठाणगे, मयूर पांचाळ, कला दिग्दर्शक अमन विधाते यांनी परिश्रम घेतले.

गडकिल्ल्याची कायमस्वरूपी प्रतिकृती

शिवरायांच्या पुतळ्य़ाचे विधिवत पूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱया गडकिल्ल्याच्या प्रतिकृतीच्या कामाचे भूमिपूजनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यंदा शिवजयंतीनिमित्ताने महाराजांच्या पुतळय़ाच्या सभोवताली शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती. यापुढे या पुतळय़ाभोवती कायमस्वरूपी गडकिल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.