
सामना प्रतिनिधी । मुंबई
देशाची सत्ता 50 ते 60 वर्षे काँगेसच्या हातात होती. या काळात इतके घोटाळे केलेत की, यांची मुले आता घोटाळय़ांच्या नावावरून शाळेची बाराखडी शिकताहेत. सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, टू जी घोटाळा, कोळसा घोटाळा…! तेव्हा आधी मनमोहन सिंगांच्या दहा वर्षांच्या काळातले घोटाळे आठवा आणि मग विचारा लाज वाटते का, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर केला.
शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप महायुतीचे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारसभेचे आयोजन मंगळवारी गोरेगाव येथे करण्यात आले होते. गर्दीने खचाखच भरलेल्या मैदानात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चारीमुंडय़ा चीत केले. उद्धव ठाकरे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीने अत्यंत हीन पद्धतीने राजकारण सुरू केले आहे. घोटाळे करून निर्लज्जम् सदासुखी असलेल्यांची ही आघाडी आम्हालाच विचारतेय लाज वाटते का? राफेलच्या व्यवहारांची चौकशीची मागणी करताहेत; पण सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा अशा तुम्ही केलेल्या अनेक घोटाळय़ांची आधी चौकशी होऊ द्या. जे आज हयात नाहीत त्या दिवंगत माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव वारंवार कशाला घेताय? पर्रीकरांच्या चिरंजीवांनी तर तुम्हाला उत्तर दिलेयच, पण असे हीन राजकारण करताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
टॉयलेटचे पेपर खाल्ले, शेणही खाल्लंत…
काँग्रेस-आघाडीला त्यांची जागा दाखवून अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार आले; पण गादीवर आम्हीच बसणार असा समज झालेल्यांनी अटलजींचे चांगले चाललेले सरकार त्याविरोधात आरोपांचे रान उठवून पाडले. आजही तेच सुरू केले आहे. परदेशी व्यक्ती पंतप्रधान नको म्हणून पहिल्यांदा शिवसेनाप्रमुखांनी विरोध केला. मग तोच मुद्दा शरद पवारांनी घेतला तेव्हा काँगेसने त्यांना लाथ मारून हाकललं. पण आता त्यांच्याच गळय़ात गळे घालताहेत, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तेव्हा क्रिकेटचे अध्यक्षपदही न सोडणारे आज शेतकऱयांसोबत फोटो काढताहेत. चारा छावण्यांना भेट देण्यासाठी म्हणे हेलिकॉप्टर सोडून पायी प्रवास केला. पण चौकशी केल्यानंतर कळलं ते शेतकरी धास्तवाले होते. तेच शेतकरी सांगताहेत मागच्या दुष्काळात या काँग्रेस राष्ट्रवादीने चारा छावण्या तर सोडाच गुरांच्या शेणाचाही घोटाळा केला. कॉमनवेल्थमध्ये टॉयलेटचे पेपर खाल्लेत आणि दुष्काळात शेतकऱयांच्या गुरांचं शेणही खाल्लंत…असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा धृतराष्ट्र झालाय
मांजर डोळे मिटून दूध पिते…तसा यांनी देश पिळून खाल्लाय. पवारसाहेब, राहुल गांधी, तुमच्या आघाडीचा धृतराष्ट्र झालाय पण माझ्या महाराष्ट्राचे डोळे उघडे आहेत. त्या उघडय़ा डोळ्याने ही जनता दिल्लीच्या तख्तावर पुन्हा एकदा भगवा फडकवणार आहे. मतदार मर्द असतो. जिथला मतदार मर्द असतो तिथला खासदारही मर्द असतो. धनुष्यबाण आणि कमळ या दोनच निशाण्या देशाला सुरक्षित ठेवतील, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
याप्रसंगी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री रवींद्र वायकर व विद्या ठाकूर, आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू आणि ऍड. अनिल परब, आमदार विलास पोतनीस, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, भाजपाचे आमदार व उत्तर-पश्चिम जिल्हा अध्यक्ष अमित साटम, जयप्रकाश ठाकूर, रिपाइं नेते अर्जुन डांगळे व अविनाश महातेकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, नगरसेवक व विभाग संघटक साधना माने व राजुल पटेल, रासपचे मनीष पटेल, भाजप महिला मोर्चाच्या सरिता राजपुरे आदी उपस्थित होते.
जनसेवेसाठी मतदार पुन्हा संधी देतील – गजानन कीर्तिकर
खासदार म्हणून मतदारसंघातील जनतेसाठी आपण जास्तीत जास्त कामे करण्यावर नेहमीच भर दिला असे सांगतानाच शिवसेना नेते व महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी मतदार आपल्याला पुन्हा संधी देतील आणि जनसेवेचा हा वसा असाच सुरू राहील, असा विश्वास या वेळी व्यक्त केला. संसदेत आपण जनतेच्या सोयीसुविधांशी निगडित एक हजारांपेक्षा जास्त प्रश्न मांडले. अनेक अशासकीय विधेयके मांडली. मतदारसंघात खासदार निधीतून 46.50 कोटी रुपये खर्चाची कामे केली. 108 रुग्णांना 1 कोटी 70 लाख रुपये पंतप्रधान रुग्णसहाय्य निधी मिळवून दिला, असे याप्रसंगी कीर्तिकर म्हणाले.
मोदींना पाडायला निघालेले लढायला तयार नाहीत – सुभाष देसाई
नरेंद्र मोदी यांना पाडण्याची भाषा करणारे शरद पवार, ममता बॅनर्जी, मायावती हे निवडणुकीत लढायला मात्र तयार नाहीत. म्हणजेच स्वर्ग पाहायचाय पण मरायला तयार नाहीत, अशी टीका या वेळी शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली. 500 फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी, आठ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त आदी मागण्या शिवसेनेने मान्य करून घेतल्या तसेच केंद्र सरकारनेही जनतेच्या कल्याणासाठी, विकासासाठी बरीच उल्लेखनीय कामे केली आहेत यांचा दाखला या वेळी देसाई यांनी दिला.
पळपुटय़ा निरुपमला पळवून लावा – आशीष शेलार
महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर संजय निरुपम नावाचा पळपुटा उभा असून शिवसेनेतून, उत्तर मुंबईतून पळ काढलेल्या या निरुपमला उत्तर-पश्चिम मतदारसंघातील मतदारही पळवून लावतील, असे या वेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष ऍड. आशीष शेलार म्हणाले. तर देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुंबईतील सर्व सहा शिलेदार खासदार होऊन दिल्लीत जातील आणि देशात पुन्हा नरेंद्र मोदी सरकार येईल, असा विश्वास याप्रसंगी रिपाइंचे नेते अर्जुन डांगळे आणि अविनाश महातेकर यांनी व्यक्त केला.
पलीकडच्या उमेदवाराला लाथ मारली नसती तर काँग्रेस फुटली असती
एकीकडे गजानन कीर्तिकर यांच्यासारखा एकाच शिवसेना पक्ष आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निष्ठा असलेला निष्ठावान कार्यकर्ता, तर पलीकडचा उमेदवार ज्याची बोलायचीही लायकी नाही. त्याला जर राहुल गांधी यांनी लाथ मारून त्या पदावरून हटवला नसता तर आज काँग्रेस फुटली असती. तोच म्हणतोय, गजाभाऊंनी पाच वर्षांत काय केलं? अरे आधी तू काय केलं ते राहुल गांधींना विचार, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना भस्म लावून हिमालयात जावं लागेल
या घोटाळेबाजांना पाच वर्षांपूर्वी जनतेने लाथ घातली. या काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारा जनतेने जी लाथ घातली ते आठवते का, असा जोरदार हल्ला चढवत उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांत सत्तेबाहेर राहिले आणि सुधारले असं होईल असं तुम्हाला वाटतंय का, असा सवाल केला. सोनिया गांधी यज्ञयाग करताना दिसल्या. सोबत प्रियंका गांधीही होत्या, राहुल गांधीसुद्धा मंदिरांमध्ये फिरत आहेत. काल परवा सुशीलकुमार शिंदेही कपाळाला भस्म लावून प्रचाराला निघाले होते. आता ते भस्म साठवून ठेवा; कारण उद्या काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना भस्म लावून हिमालयात जावं लागणार आहे, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.






























































