शिवाजी पार्कवर सापडले पाण्याचे जिवंत झरे! नूतनीकरणावेळी लागले 35 छोट्या विहिरींना पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिग्गजांच्या सभांनी गाजलेले आणि सांस्कृतिक-राजकीय वारसा असणाऱया दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या नूतनीकरणादरम्यान खोदलेल्या 35 रिंग वेल (छोटय़ा विहिरी)मध्ये गोडय़ा पाण्याचा साठा सापडला असून त्यामुळे मैदानावर फवारण्यासाठी वर्षभर पाणी पुरणार आहे. समुद्रापासून अगदी काही फुटांवर सापडलेले हे पाणी म्हणजे शेकडो वर्षांपासून आकाशातून कोसळून मैदानाखाली जमा झालेले हे गोडय़ा पाण्याचे जणू तलावच आहे, अशी माहिती मैदानात पालिकेच्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचे मानद सल्लागार भूगर्भतज्ञ नंदन मुणगेकर यांनी दिली. पालिकेच्या माध्यमातून मैदानाचे नूतनीकरण सुरू आहे.

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दररोज शेकडो खेळाडू खेळण्यासाठी येतात. या ठिकाणी सात क्रिकेट पीच आहेत. हे मैदान 25 एकर परिसरात पसरले आहे. क्रिकेट पीचसभोवतालचा काही भाग सोडल्यास मैदानावर गवत नसल्याने परिसरात मोठय़ा प्रमाणात धूळ पसरते. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये टीबी तसेच इतर आजार वाढल्यामुळे पालिकेने मैदानावर गवत आणि पाण्याचा फवारा नियमितपणे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणारे पाणी मिळवण्यासाठी पालिकेने मैदानात 35 रिंग वेल (छोटय़ा विहिरी) खोदल्या असताना हा गोडय़ा पाण्याचा प्रचंड साठा सापडला.

फवारणीसाठी वर्षभर पाणी मिळणार

मैदानावर पाणी फवारण्यासाठी या ठिकाणी 40 हजार लिटर पाणी उपलब्ध आहे, तर आणखी एक 20 हजार लिटरची टाकी मिळून 60 हजार लिटर पाणी मिळू शकते. फवारण्यासाठी सुमारे 2 लाख 40 हजार लिटर पाणी कमी पडते. मात्र, हा पाणीसाठी मिळाल्यामुळे मैदानावर फवारण्यासाठी वर्षभर पाणी उपलब्ध होणार आहे तसेच धुळीच्या समस्यापासून स्थानिकांची मुक्तता होणार आहे, अशी माहिती जी-उत्तरचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

मुंबईतील मैदानांखाली पाण्याचा साठा

समुद्राजवळच्या किंवा समुद्रात बांधलेल्या अनेक किल्ल्यांमध्ये गोडय़ा पाण्याच्या विहिरी आहेत. सिंधुदुर्ग, जंजिरा यांसारखे अनेक जलदुर्ग आहेत. मुंबईत पूर्वी प्रत्येक मिलमध्ये कपडय़ावरील अनेक प्रक्रिया करण्यासाठी मिलमालकांनी तलाव बांधले. या तलावातील पाणी गोडेच आहे. प्रभादेवीला समुद्राच्या अगदी जवळ असलेल्या इंदू मिलमध्येही 100 वर्षे जुना गोडय़ा पाण्याचा तलाव आहे. मुंबईचे 99 टक्के काँक्रिटीकरण झाले आहे. मात्र, जी 1 टक्का मैदाने उरली आहेत त्याखाली गोडे पाणी आहे, अशी माहिती मुणगेकर यांनी दिली.

मुंबईतील प्रभादेवी, वरळी ते दादरपर्यंतची जमीन मोठय़ा प्रमाणात वाळुकामय आहे. त्यामुळे मुंबईत सर्वात जास्त म्हणजे 300 गोडय़ा पाण्याच्या विहिरी केवळ या भागात आहेत.

मुंबई आधी बेट होते. ते बुजवून नंतर आधुनिक रूप मिळाले. त्यामुळे मुंबईखाली पाणी आहेच. त्यामुळे केवळ हे मैदान समुद्राजवळ आहे म्हणून इथे गोडे पाणी सापडणार नाही असे होत नाही.

या आधी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवलेल्या ओव्हल मैदानाखालीही गोडे पाणी सापडले आहे. त्यांचे आम्ही योग्य व्यवस्थापन केले, अशी माहिती मुणगेकर यांनी दिली.