दोन दुचाकींना एकच नंबरप्लेट; नियम मोडतो एक, भुर्दंड बसतो दुसीऱ्याला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात एकाच नंबरच्या दोन दुचाकी धावत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अशा प्रकारामुळे वाकोल्यातील प्रसाद सिंग या तरुणाला मात्र भलताच मनस्ताप होत आहे. त्याच्या नंबरची दुसरी दुचाकी असल्यामुळे दुसऱया दुचाकीस्वाराने वाहतूक नियम मोडल्यानंतर दंडाचा भुर्दंड मात्र त्याला सोसावा लागत आहे. याबाबत प्रसादने वाहतूक पोलिसांकडे रीतसर तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.

प्रसाद हा वाकोल्याच्या मिलिटरी कॅम्प येथे राहतो. त्याची एमएच 01 सीई 5059 नंबरची मोटारसायकल आहे. प्रसादने आपल्यावर दंडाचे किती चलन आले आहेत ते अॅपवर पाहिल्यानंतर त्याला धक्काच बसला. 2017 ते 2021 या काळात मिळून 10 ई-चलन आले होते.

मार्च 2017 मध्ये एक स्प्लेंडर मोटारसायकलस्वार विना हेल्मेटमुळे प्रसादला ई चलनद्वारे दंड ठोठावला गेला तर 2018 मध्ये सिग्नलच्या रेषेचे उल्लंघन केल्याप्रकरणी. त्यानंतर जून 2020 मध्ये प्रसादला पुन्हा एक ई चलन आले. त्यात एक महिला मोटारसायकल चालवत होती असे नमूद असल्याचे पाहून त्याला धक्काच बसला. सेम नंबर असल्याने त्याचे ई चलन प्रसादला आले होते. फेब्रुवारी 2021 मध्ये प्रसादला पुन्हा आणखी एक ई चलन आले. त्यामध्येही एक महिला मोटारसायकल चालवत असून तिने सिग्नल तोडल्याचे नमूद होते. नंबर प्लेटच्या डबल रोलमुळे वारंवार येणाऱया अशा ई-चलनबाबत प्रसादने स्थानिक शाखाप्रमुख शोभन तेंडोलकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली.

नंबरचा गैरवापर होत असल्याप्रकरणी एमटीपी अॅप्सवर तक्रार करावी. बनावट नंबरचा वापर करणाऱयावर नजर ठेवली जाईल. जे कोणी त्या नंबरचा वापर करत असेल अशांना शोधून त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. – यशस्वी यादव, सहपोलीस आयुक्त, वाहतूक

चौदा दिवसांत 54 लाखांचा दंड वसूल

वाहतुकीचे नियम मोडणाऱया चालकांकडून दंडवसुलीसाठी वाहतूक पोलिसांनी खास मोहीम हाती घेतली आहे. दंड थकवणाऱया चालकाच्या घरी वाहतूक पोलीस जाऊन त्याच्याकडून दंड वसूल करत आहेत. गेल्या चौदा दिवसांत आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी 54 लाखांचा दंड वसूल केला आहे. दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी 50 पथके तयार केली असून प्रत्येक पथकात दोन पोलीस शिपाई आहे.