सोसायट्यांचा फायर ऑडिट रिपोर्ट आता अॅपवर! आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देवेंद्र भगत

मुंबईमध्ये आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी सोसायटय़ांना दर सहा महिन्यांनी फायर ऑडिट करून पालिकेला हा अहवाल ऑनलाइन सादर करावा लागणार आहे. यासाठी पालिका एक अत्याधुनिक अॅप विकसित करीत आहे. या अॅपमध्ये ‘फायर सेफ्टी अॅक्ट 2006’च्या तरतुदीनुसार रहिवाशांना आवश्यक नियम, अटी आणि उपाययोजनांचीही माहिती असेल. अग्निसुरक्षेची यंत्रणा कार्यक्षम नसेल तर तातडीने कार्यवाही करावी लागणार आहे. या अॅपमुळे संपूर्ण मुंबईच्या अग्निसुरक्षेची स्थितीदेखील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी ही माहिती दिली.

मुंबईत वर्षभरात घडणाऱया दुर्घटनांमुळे पालिकेच्या अग्निशमन दलाला वर्षभरात सुमारे पंधरा हजार ते साडेपंधरा हजार कॉल बचावकार्यासाठी येतात. यामध्ये सुमारे 33 टक्के म्हणजे सुमारे पाच हजार कॉल हे आगीच्या दुर्घटनांचे असतात. गेल्या काही वर्षांपासून मुंबईचा वेगाने होणारा औद्योगिक विकास, नागरीकरण यामुळे दाट वस्ती आणि उंच इमारतींची संख्याही वाढली आहे. या सर्व आस्थापनांमध्ये बहुतांशी ठिकाणी अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. मुंबईत सद्यस्थितीत इमारती, झोपडपट्टी, आस्थापने मिळून सुमारे 40 लाख प्रॉपर्टीज आहेत. अशा सर्व ठिकाणी पालिकेला पोहोचून ऑडिट करणेही शक्य होत नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अॅण्ड लाइफ सेफ्टी अॅक्ट मेजर्स अॅक्ट 2006’मधील तरतुदीनुसार दर सहा महिन्यांनी सोसाटय़ांना फायर ऑडिट रिपोर्ट सादर करावा लागेल. याच्या अंमलबजावणीसाठी अॅप बनविले जाणार असून पालिकेने सल्लागार नेमून कार्यवाही करण्यास सुरुवात केल्याची माहिती अश्विनी भिडे यांनी दिली.

अत्याधुनिक यंत्रणा, ‘अग्निसाक्षर’ मुंबईकर!

  • मुंबईत गेल्या तीन वर्षांत आगीच्या घटनांची संख्या स्थिर असली तरी घडणाऱया दुर्घटनाही रोखण्याचे आव्हानही आहे. मुंबईची दाट वस्ती, 300 मीटर उंचीपर्यंतच्या इमारती, अनेक मोठे प्रकल्प यामुळे अग्निसुरक्षा यंत्रणेत गुणात्मक वाढ होणे गरजेचे आहे.
  • पालिकेकडे सध्या 90 मीटर उंचीच्या शिडय़ा आहेत. मात्र शिडय़ांनी केवळ 100 मीटरपर्यंत बचावकार्य करणे शक्य असते. मात्र मुंबईतील उत्तुंग इमारतींची संख्या पाहता जीवित-वित्तहानी टाळण्यासाठी आता इमारतींमध्ये अग्निसुरक्षा कायमची सक्षमपणे कार्यान्वित ठेवणे गरजेचे आहे.
  • त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी फायर सेफ्टी अॅक्टमधील तरतुदींची सक्षमपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. आग लागूच नये यासाठी काळजी, खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही अश्विनी भिडे यांनी सांगितले.
  • यासाठी नागरिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. जनजागृतीच्या माध्यमातून मुंबईकरांना ‘अग्निसाक्षर’ केले जात आहे. अग्निशमन दलाचे अद्ययावतीकरण केले जात आहे. बचावकार्यासाठी रोबोट, फायर सेफ्टी बाईकसारखी नवी यंत्रसामग्रीही आणली जात असल्याचेही त्या म्हणाल्या.
  • मुंबईत लागणाऱया आगींमध्ये तब्बल 80 टक्के आगी शॉर्टसर्किटने लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोसायटय़ा, इमारती, आस्थापनांना इलेक्ट्रिक ऑडिटही करावे लागणार आहे. कायद्यामध्येही तशी तरतूद आहे. इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटप्रमाणे इलेट्रिकल सिस्टीमची तपासणी ‘इलेक्ट्रिकल ऑडिटर’ नेमून करण्याची गरज आहे. त्यादृष्टीनेही पालिका कार्यवाही करीत आहे.