
प्रबोधन क्रीडा भवनात सुरू असलेल्या 46व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात गोकुळधाम हायस्कूलने सर्वोत्तम कामगिरी करत सांघिक जेतेपद पटकावले तसेच 14 वर्षांखालील धावण्याच्या शर्यतीत कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलच्या आदित्य प्रताप सिंगने दुहेरी पराक्रम केला. त्याने 400 मीटर व 200 मीटर शर्यतींत अव्वल स्थान पटकावले, तर सेंट फ्रान्सिस स्कूलमधील सान्वी पाटीलने थाळीफेक आणि गोळाफेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून जेतेपद काबीज केले.
गोरेगाव पूर्वच्या गोकुळधाम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजने 96 गुणांसह एकूण सांघिक जेतेपद जिंकले. मार्च पास्ट स्पर्धेत रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल अँड कॉलेजने प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या महोत्सवात 300 पेक्षा जास्त शाळा आणि 4 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आपले क्रीडानैपुण्य विविध खेळांच्या माध्यमातून दाखवले. या क्रीडा महोत्सवाचा पुरस्कार वितरण सोहळा प्रबोधन गोरेगावचे संस्थापक आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी सुप्रिया लाईफचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सतीश वाघ, संस्थेचे अध्यक्ष नितीन शिंदे उपस्थित होते.
































































