
मुंबई उपनगर जिल्हा को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. पूर्व तसेच पश्चिम उपनगरांतील गृहनिर्माण संस्थेच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या हौसिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अभिषेक घोसाळकर हे सध्या गृहनिर्माण संस्था विभागातून मुंबै बँकेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यामुळे उपनगरातील हौसिंग फेडरेशन शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. संस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून सचिवपदी महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे रमेश प्रभू यांची निवड झाली आहे. प्रभू हे डीम्ड कन्व्हेयन्स कायद्यासाठी शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करत आहेत, तर उपाध्यक्षपदी ऍड. समीर शिर्के, कृष्णा बांबरकर, खजिनदार तर संचालकपदी डॉ. सुरेंद्र मोरे, मनोहर काजरोळकर, ऍड. सुनील राणे, चंद्रकांत दुखंडे, शशिकांत मोरे, डॉ. मिहीर शहा, नंदकुमार वरणकर, दर्शना गोलतकर, प्रमोद शिंदे व विभुती पंडय़ा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुनर्वसनासाठी रखडलेल्या सोसायटय़ांना न्याय देणार
धोकादायक तसेच पुनर्वसनासाठी रखडलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना न्याय देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले. तसेच उपनगरातील गृहनिर्माण संस्था सभासदांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. गृहनिर्माण संस्थांचे डीम्ड कन्व्हेयन्स, उपविधीमधील दुरुस्ती आदी प्रश्नही मार्गी लावले जाणार आहेत. गृहनिर्माण संस्थेचा कारभार अधिक पारदर्शक करून संस्थेच्या प्राप्त तक्रारींवर निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला जाईल. तसेच लवकरच मुंबई उपनगर जिल्हा हौसिंग टाईम्स हे मासिक सुरू करून सभासदांना गृहनिर्माणविषयी सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचेही घोसाळकर म्हणाले. याप्रसंगी म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, वर्सोवा विधानसभा संघटक, सभागृह नेते शैलेश फणसे, उपविभागप्रमुख राजू शेटये, शाखाप्रमुख सतीश परब आदी उपस्थित होते.

























































