मुंबईत टाटा पॉवरचे सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. टाटा पॉवरने पूर्व उपनगरात घाटकोपर येथे इलेक्ट्रिक वाहनांसाठी 60 किलोवॅट क्षमतेचे सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन उभारले आहे. त्यामुळे गाडी आवघ्या 40 मिनिटांत चार्ज होणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सरकारने विजेवरील वाहनांच्या वापराला चालना दिली जात असल्याने मुंबईत विजेवरील वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर टाटा पॉवरने घाटकोपरमधील आर सीटी मॉल परिसरात अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन उभारले आहे. या चार्जिंग स्टेशनमध्ये आठ चार्जर आहेत. त्यामध्ये एक 60 किलोवॅटचा असून त्या माध्यमातून एकाच वेळी दोन गाडय़ा चार्ज करता येणार आहेत. तर अन्य 7 चार्जर 30 किलोवॅटचे असून त्यावर प्रत्येकी एक गाडी चार्ज करता येणार असल्याचे टाटा पॉवरने स्पष्ट केले आहे. या चार्जिंग स्टेशवर वाहनधारकांना वीज नियामक आयोगाने निश्चित केलेल्या सुमारे साडेसहा रुपये प्रतियुनिट दराने वीज उपलब्ध होणार आहे. टाटा पॉवरने आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी तीन हजारहून अधिक चार्जिंग स्टेशन उभारली आहेत.