
पर्यावरणात असे असंख्य जीव आहेत जे अद्याप मानवासाठी अज्ञात आहेत. संशोधक मंडळी रात्रंदिवस परिश्रम करून अशा जिवांचा शोध घेत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी अशाच एका मत्स्यप्रजातीचा शोध लावला आहे. ‘ईल’ माशाची ही नवी रक्तवर्णीय प्रजाती मुंबईतील गोडय़ा पाण्यामध्ये सापडली. मुंबादेवीचा आशीर्वाद असलेल्या मुंबई शहराच्या नावावरून तिचे नामकरण ‘रक्थमिच्थिस मुंबा’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सापडलेली ‘ईल’ची अशा प्रकारची ही पहिली प्रजाती आहे.
‘अॅक्वा इंटरनॅशनल जर्नल ऑफ इचथ्योलॉजी’ या संशोधन पत्रिकेमध्ये या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तेजस ठाकरे यांना जोगेश्वरीमधील अंध मुलांच्या शाळेच्या आवारात असणाऱया 40 फूट खोल विहिरीमध्ये 2019 मध्ये ही प्रजाती आढळली होती. त्या प्रजातीचे पाच नमुने त्यांनी घेतले होते. त्यानंतर या प्रजातीच्या नावीन्याबाबत संशोधन करण्यात आले. तेजस ठाकरे, प्रवीणराज जयसिंहा, अनिल मोहोपात्रा आणि अन्नम पवन कुमार या संशोधकांनी या प्रजातीच्या नावीन्याबाबत संशोधन केले.
गोडय़ा पाण्यात आढळणाऱया जैवविविधतेबद्दल अजूनही पुरेसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे ‘रक्थमिच्थिस मुंबा’चा शोध हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या शोधामुळे अशा प्रजातींचे अधिक संशोधन आणि संवर्धनाची गरज अधोरेखित झाली आहे. निसर्गात अशी अनेक आश्चर्ये अजूनही अज्ञात आहेत. ‘रक्थमिच्थिस मुंबा’ म्हणजे हिंदुस्थानात आढळणाऱया ‘रक्थमिच्थिस’ कुळातील आगळेवेगळे उदाहरण आहे आणि या नव्या ‘ईल’ प्रजातीचे मूळ स्थान हे मुंबईच आहे. कारण अन्यत्र कुठेही अशी प्रजाती आढळलेली नाही.
हा निसर्गाचा चमत्कारच…
‘रक्थमिच्थिस मुंबा’ हा निसर्गाचा चमत्कारच आहे. ‘ईल’ची ही नवी प्रजात म्हणजे आतापर्यंतचा माझा 35 वा शोध आहे. मी शोधलेल्या सर्व प्रजातींमधील ही सर्वात महत्त्वपूर्ण प्रजात आहे. निसर्गात, पर्यावरणात, भूगर्भात अशा विविध दुर्मिळ प्रजाती आहेत. ‘रक्थमिच्थिस मुंबा’ ही प्रजात जमिनीखाली आढळत असल्याने तिचे महत्त्व अधिक आहे. तिचे संवर्धन महत्त्वाचे आहे. अशा जिवांच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी जमिनीखालील पाण्याच्या स्रोतांचे जतनही आवश्यक ठरते, असे तेजस ठाकरे म्हणाले.
अशी आहे ‘रक्थमिच्थिस मुंबा’
‘रक्थमिच्थिस मुंबा’ ही मत्स्य कुळातील प्रजाती असली तरी तिला माशांसारखे कल्ले नाहीत. तिची लांबी सुमारे 32 सेंटीमीटर इतकी असते. रंग लालगुलाबी आहे. या ‘ईल’ प्रजातीला दातही आहेत. या प्रजातीचे एक वैशिष्टय़ म्हणजे ही प्रजाती अंध असली तरी श्वास आणि शरीरातील संवेदनांच्या आधारे भक्ष्य टिपून जिवंत राहते.
































































