
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा आणि चटके जाणवत आहेत. आज सांताक्रुझ येथे तब्बल 37 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले. बोरिवली, मुलुंड, पवई, वरळी येथेही पारा 32 अंश सेल्सियसच्या पुढेच होता. राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱया उष्ण वाऱयांमुळे महाराष्ट्रात चटके बसत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हे उष्ण वारे अरबी समुद्रावरून महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यामुळे आर्द्रता प्रचंड वाढली असून अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. अरबी आणि हिंद महासागरात हवेच्या कमी दाबामुळे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही पाऱयात कमालीची वाढ झाल्याचे चित्र आहे.

























































