मुंबईकर झाले घामाघूम, सिमेंटच्या जंगलामुळे मुंबईचा पारा वाढला; 2 अंश सेल्सिअसने तापमानवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर घामाघूम होऊ लागले आहेत. मुंबईच्या बांधकाम क्षेत्रात 66 टक्क्यांनी झालेली वाढ आणि जमीन वापराच्या पद्धतीतील बदलामुळे मुंबईला ‘अर्बन हिट आयलॅण्ड इफेक्ट’ जाणवू लागला आहे. त्यामुळे मुंबईचे तापमान सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसनी वाढल्याचे अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.

नवी दिल्लीतील जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील नॅचरल सायन्सेस विभाग, हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठ आणि उत्तर प्रदेशातल्या अलिगड मुस्लिम विद्यापीठातील अभ्यासकांच्या ‘अर्बन हिट आयलॅण्ड डायनामिक्स इन रिस्पॉन्स टू लॅण्ड-युज-लॅण्ड-कव्हर चेंज, इन द कोस्टल सिटी ऑफ मुंबई’ या अभ्यास अहवालात हे वास्तव मांडण्यात आले आहे. हा अहवाल ‘इंडियन रिमोट सेन्सिंग जर्नल’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

40 टक्के हिरवाई, 30 टक्के जलक्षेत्र गमावले

मुंबईने 1991 ते 2018 या काळात 81 टक्के मोकळ्या जागा, 40 टक्के हिरवाई आणि सुमारे 30 टक्के जल क्षेत्र गमावल्याचे नुकत्याच झालेल्या अभ्यासातून दिसून येते. मात्र त्याच दरम्यान बांधकाम क्षेत्रफळात 66 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळेच मुंबईच्या तापमानात वाढ झाल्याचा निष्कर्ष या अभ्यासात मांडला आहे.

हिरवाई नष्ट झाल्याचा परिणाम

मुंबईतील उष्म्यात होत असलेल्या वाढीचा संबंध हा शहराचे हरित आच्छादन कमी होण्याशी असून, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खूप मोठय़ा प्रमाणात हिरवाई नष्ट केली गेली, असे जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या नॅचरल सायन्सेसचे प्रा. अतिक-उर-रहमान यांनी नमूद केले.

उष्म्यावर मात कशी करायची?

z घरांच्या गच्चीवरील बगिचा वाढविणे
z इमारतींसाठी काचांचा वापर टाळणे
z छतावरील शहरी शेतीला प्रोत्साहन

अशाश्वत विकासही कारणीभूत

ऑक्टोबर हिटमुळे होत असलेल्या घालमेलीसाठी केवळ वातावरण बदलास दोष देऊन चालणार नाही, तर वेगाने होत असलेल्या शहरीकरणाच्या जोडीनेच अशाश्वत विकास आणि हिरवाई कमी होणे यामुळे गेल्या तीन दशकांमध्ये मुंबईकरांना वाढत्या तापमान तीव्रतेला तोंड द्यावे लागत आहे. वाढत्या उष्म्यामुळे शहरातील रहिवाशांना आरोग्यविषयक धोकेही वाढण्याची शक्यता आहे.