
आभाळाची भट्टी तापली आहे. मुंबईच्या कमाल तापमानात वारंवार वाढ होत आहे. तापमानाने आज 34 अंशांची कमाल मर्यादा गाठली. उन्हाची काहिली वाढल्याने मुंबईकरांना घराबाहेर पडल्यानंतर अक्षरशः चटके बसत आहेत.
रविवारी मुंबईतील कमाल तापमान 34 तर किमान 25 इतके नोंदले गेले. वातावरणातला उकाडा वाढला आहे. मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. मुंबईतील हवा दमट असल्यामुळे बाहेर पडल्यानंतर घामाने कपडे चिंब होत आहेत. लोकलमधून प्रवास करतानाही बाहेरची गरम हवा जाणवत आहे. त्यामुळे लोकलमध्ये पंखे चालू असूनही काहीच फायदा होत नसल्याचे दिसत आहे.
घर आणि कार्यालयात पंखे आणि एसीशिवाय काम करणे कठीण झाले आहे. बाहेर उकाडय़ापासून शरीराला थोडा थंडावा मिळावा म्हणून लिंबू पाण्याच्या गाडय़ांवर गर्दी होत आहे. कोरोनाच्या काळजीने गाडय़ांवरचे लिंबू पाणी टाळलेल्या नागरिकांची गर्दी ज्यूस आणि शीतपेयांच्या दुकानांकडे वळलेली दिसत आहे.
आजारांना निमंत्रण
शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. कडाक्याच्या उनात घामाघूम झाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे होणाऱया डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे, डोकेदुखीसारखे त्रास वाढले आहेत. घामामुळे त्वचेच्या विकारातही वाढ होत असल्याचे डॉक्टर सांगतात. भरपूर स्वच्छ पाणी पिणे हा त्यावर उत्तम उपाय असल्याचा सल्ला आरोग्यतज्ञांनी दिला आहे.
आमच्याकडे ज्यूस पिण्यासाठी येणाऱयांची संख्या आठवडाभरापासून दुप्पट झाली आहे. कलिंगड, गाजर, आवळा, मोसंबी ज्यूसची मागणी वाढली आहे. अनेकजण लिंबू सरबतालाही प्राधान्य देत आहेत. विशेषतः दुपारच्या वेळी ग्राहकांची गर्दी अधिक असते. आधी ‘विदाऊट आईस’ ज्यूस पिणारे आता ‘आईस टाका’ म्हणून आवर्जून सांगत आहेत. ज्यूस विक्री 30 टक्क्यांनी वाढली आहे.
z शिवकुमार गुप्ता, शिवा ज्यूस सेंटर, डिलाईड रोड
उकाडय़ाने पशुपक्षीही हैराण
असह्य उकाडय़ाने भायखळा येथील वीर जिजामाता उद्यानातील प्राणीही हैराण झाले आहेत. थंडाव्यासाठी त्यांच्या अंगावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या पिंजऱयांमध्येही थंडाव्यासाठी पाण्याची डबकी बनवली गेली आहेत. चिमणी, कावळे, कबुतरे, घारी यांचीही अशीच अवस्था आहे. तापमान वाढल्याने त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन ते भोवळ येऊन खाली कोसळत आहेत. त्यात अनेकांचा मृत्यूही होत आहे. परळच्या बैलघोडा रुग्णालयात अशा अनेक पक्ष्यांना उपचारासाठी पशुप्रेमींनी दाखल केले आहे. पक्ष्यांसाठी घराच्या खिडक्यांमध्ये पिण्याचे पाणी ठेवावे, असे आवाहन त्यांनी मुंबईकरांना केले आहे.




























































