
गणित, विज्ञान, इंग्रजीमुळे दहावीची परीक्षा पार करू न शकल्यामुळे अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक खूशखबर आहे. दहावीची परीक्षा आता सोपी होणार असून अवघड वाटणाऱया विषयांशिवायच यापुढे परीक्षा देता येणार आहे. जानेवारी 2020 पासून मुक्त विद्यालयाचे दहावीचे वर्ग सुरू होणार आहेत. आठवी पास तसेच वयाची 15 वर्षे पूर्ण करणारा कोणताही विद्यार्थी दहावी प्रवेशास पात्र ठरणार आहे.
दहावीच्या वर्गाची वैशिष्टय़े
अभ्यासक्रम एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमासारखाच.
दोन भाषा विषयांसह कोणतेही तीन असे एकूण पाच विषय निवडीचे स्वातंत्र्य.
राज्य शिक्षण मंडळाच्या एकूण 21 व राष्ट्रीय कौशल्य विकास अभ्यासक्रमातील एकूण 14 विषयांमधून विषय निवडता येणार.
एकदा नोंदणी केल्यानंतर पाच वर्षांपर्यंत परीक्षा देण्याची सूट.
9 वेळा परीक्षा देण्याची संधी. सोयीनुसार कोणत्याही विषयाची परीक्षा देता येणार.
रायटर, कॅलक्युलेटर वापराची सवलत
दहावी, बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणाऱया सवलती मुक्त विद्यालयातून दहावीची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांनादेखील मिळणार आहेत. हे विद्यार्थी रायटर्सची मागणी करू शकतात. शिवाय कॅलक्युलेटरही वापरू शकतात.
डिसेंबरपासून विद्यार्थी नोंदणी
मुक्त विद्यालयातून दहावीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. डिसेंबरपासून आम्ही विद्यार्थी नोंदणीला सुरुवात करू. उपस्थितीची अट तसेच विषय निवडीचे बंधन नसल्यामुळे या वर्गांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळेल असे राज्य समन्वयक मुक्त विद्यालय मंडळाचे सुभाष राठोड यांनी सांगितले.

























































