मुंबई-पुणे रेल्वेमार्ग सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिवृष्टीने सातत्याने दरडी कोसळल्याने तसेच भूस्खलनाने गेले 13 दिवस बंद असलेला मुंबई ते पुणे रेल्वेमार्ग अखेर सुरू झाला आहे. या मार्गावरील सर्व इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत.17 व 18 तारखेच्या एकूण 36 ट्रेन चालविण्याचा निर्णय झाला आहे.

मध्य रेल्वेच्या कर्जत ते लोणावळा दक्षिण-पूर्व घाट विभागात सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे गेले काही दिवस बंद असलेली मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली आहे. मुंबई ते पुणे मार्गावरील मालगाडय़ांची वाहतूकही कालपासून सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी काही निवडक गाडय़ा चालविण्यात आल्यानंतर मध्य रेल्वेने 17 व 18 ऑगस्टच्या रद्द केलेल्या गाडय़ांपैकी एकूण 36 गाडय़ा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही संपूर्ण वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी 28 ऑगस्टची वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई ते पुणे मार्गावरील बंद पडलेल्या 46 ट्रेनपैकी शुक्रवारी 18 ट्रेन चालविण्यात आल्या. शनिवारच्या या मार्गावरील बहुतेक ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. 4 ऑगस्टपासून हा मार्ग बंद पडल्याने मध्य रेल्वेचे 145 कोटी रुपयांपेक्षा जादा नुकसान झाले आहे. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच 13 दिवसांपेक्षा जास्त काळ हा मार्ग बंद पडला होता. 250 हून अधिक रेल्वे कर्मचाऱयांनी दिवसरात्र मेहनत घेऊन हा मार्ग पूर्ववत केला आहे. या मार्गावरून रोज 43 ट्रेन येतात, तर 43 ट्रेन जात असतात.