
ताडोबामध्ये सफारीसाठी आलेल्या मुंबईच्या पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. केशव रामचंद्र बालगी (वय – 71) असे मृत पर्यटकाचे नाव आहे.
ताडोबातील वाघ बघण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येत असतात. दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक ताडोबाला भेट देतात. महाराष्ट्र दिनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मुंबई येथील कुटुंब सफारीसाठी आले होते. मुंबई येथील काळा आंबा परिसरात वास्तव्य असलेले केशव रामचंद्र बालगी हे कुटुंबासोबत सफारीचा आनंद घेत होते. या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
पर्यटन मार्गदर्शक व वाहन चालक यांनी त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ बु. येथे उपचारासाठी हलविले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ताडोबा प्रशासनाकडून मृत पर्यटकांच्या कुटुंबियाना धीर देण्यात आला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.




























































