प्रवासी व्हिसावर येऊन त्याने केली हिंदुस्थानात चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवासी व्हिसावर हिंदुस्थानात येऊन मोबाईल, लॅपटॉपची चोरी करणाऱया दोघा अफगाणी नागरिकांना डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. त्या दोघांकडून सहा लाख सहा हजार किमतीचे नवेकोरे लॅपटॉप तसेच पायधुणीमध्ये चोरलेले 49 नवे मोबाईल आणि विविध देशांचे चलन असलेली 50 हजारांची रोकड हस्तगत केली आहे.

ग्रॅण्ट रोड येथे स्पीड ट्रान्सपोर्टच्या नावे कुरीयरचा व्यवसाय करणारे मनोज सोमया हे बुधवारी त्यांच्याकडील माल टेम्पोत भरत असताना एक लाख किमतीचे 10 लॅपटॉप चोरीला गेले होते. सोमया यांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक राजा बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सावंत, यादव व पथकाने तत्काळ तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता दोन इसम लॅपटॉप घेऊन टॅक्सीने जाताना दिसले. मग त्यानुसार तांत्रिक बाबींचा अभ्यास करून त्या टॅक्सीचा माग काढून टॅक्सीचालकाचा शोध घेतला. टॅक्सीचालकाने चौकशीत त्या दोघांना कुलाबा येथील व्हिक्टोरिया ग्रॅण्ड हॉटेलमध्ये सोडल्याचे सांगितले. मग पोलिसांनी ते हॉटेल गाठून जाहनबीज लहामानी (27) आणि झैबुल्ला रोहानी (31) या दोघा अफगाणिस्तानच्या दोघा तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यावर दोघांनी गुह्याचा कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे 10 लॅपटॉप तसेच पायधुणी परिसरातून चोरलेले विनोद कंपनीचे 14 आणि रेडमी कंपनीचे चार नवेकोरे 35 मोबाईल हस्तगत केले.

पर्यटन सोडून चोरीचा मामला

दोघेही प्रवासी व्हिसावर हिंदुस्थानात आलेत, पण त्यांनी पायधुणी व डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरी केली. शिवाय त्या दोघांविरोधात दिल्लीच्या करोलबाग पोलीस ठाण्यातदेखील चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यांच्याकडून चोरीचा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांनी यश आले आहे.