
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राची पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमानुसार या वर्षीपासून पहिल्यांदाच एकाच वेळी दोन पदव्या घेण्याचा पर्याय विद्यापीठाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.
विद्यापीठाच्या ‘सीडीओई’ (सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाइन) शिक्षण केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी किमान पात्रताधारकांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. यानुसार पदवी स्तरावरील अभ्यासक्रमात बीए (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी, आणि इंग्रजी) या विषयांचा समावेश आहे. बीकॉम (कॉमर्स, अकाऊटंसी, आणि बिझनेस मॅनेजमेंट), बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचा समावेश असून या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केले जात आहेत.
पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम
एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क); एम.कॉम., एम.कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट), एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) एमएमएस, एमसीए या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सीडीओईच्या सर्व अभ्यासक्रमांची माहिती सीडीओईच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील या सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेतस्थळावरून करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंबंधातील सर्व तपशील विद्यापीठाच्या https://cdoe.uom.edu.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.


























































