मुंबईची वाढती तहान भागवणार, विहार तलावाचा ‘ओव्हरफ्लो’पाणी पिण्यासाठी वापरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी पालिका विहार तलावातून ‘ओव्हरफ्लो’ होणारे पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरणार आहे. यासाठी पालिकेच्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात यंत्रणा उभारली जाणार आहे. यासाठी पालिकेकडून अर्थसंकल्पात 12 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वाया जाणाऱ्या हजारो लिटर पाण्याचा सदुपयोग होणार असून मुंबईची वाढती तहान भागण्यास मोठी मदत होणार आहे.

मुंबईला दररोज अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून एकूण 3850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र मुंबईचे वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. यातच गेल्या काही वर्षांपासून मान्सून सक्रिय होण्यास जुलै उजाडत असल्याने तलावांतील पाणीसाठा तळ गाठतो. या वर्षीही हीच स्थिती राहिल्याने पालिकेला मुंबईत 27 जून 2022पासून 10 टक्के पाणीकपात लागू करावी लागली होती. त्यामुळे मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी पालिका नव्या उपाययोजना करीत आहे.

दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

या प्रकल्पासाठी विहार तलावाजवळ पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. हे पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पात आणले जाईल. या ठिकाणी शुद्धीकरणाच्या सर्व प्रक्रिया करून हे पाणी पिण्यासाठी पुरवले जाईल. दोन वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून खर्चही वाढणार आहे. यासाठी सल्लागाराच्या नियुक्तीनंतर किती पाण्यावर प्रक्रिया केली जाणार हे निश्चित होणार आहे.

भांडुपला नवे जलशुद्धीकरण केंद्र

पालिकेच्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात सध्या 1910 दशलक्ष लिटर पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. सुमारे 44 वर्षांपूर्वी या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या केंद्राची स्थिती संरचनात्मकरीत्या कमकुवत झाली असून आयुर्मानही संपत आले आहे. त्यामुळे या ठिकाणी 2 हजार दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तोपर्यंत जुना प्रकल्प सुरू राहणार आहे.