
विलेपार्ले येथे 13 मजली इमारतीला संध्याकाळी आग लागली. या आगीत अडकलेल्या तिघांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली. आगीत कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही.
विलेपार्ले पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळच्या बजाज रोडवरील लाभ श्रीवाली या 13 मजली इमारतीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावर संध्याकाळी 7 च्या सुमाराला आग लागली. या मजल्यावर दोन ते तीन कार्यालये आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र हवेमुळे आगीने भीषण रूप धारण केले आणि ही आग पसरली. अग्निशमन दलाने 8 बंबांच्या सहाय्याने पावणेनऊपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी इमारतीत अडकून पडलेल्या तीन जणांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले.
नेमके काय घडले?
इमारतीत 20 कुटुंबे राहतात. बी विंगच्या आठव्या मजल्यावरील घरात फर्निचरचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक तेथे आग लागली आणि ती पसरली. ज्या घरात हे काम सुरू होते तेथे संघवी कुटुंब देन दिवसांनी राहायला येणार होते.
दरम्यान, आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे धाव घेतली. आठव्या मजल्यावर भारतीबेन पटेल (वय 82) ही वृद्ध महिला एकटीच राहते. तिला वाचवण्यासाठी जिग्नेश जेठवा यांनी तातडीने धाव घेतली आणि अग्निशमन जवानांच्या मदतीने तिला खाली आणले. संजय जाधव, हंसराज गुप्ता, पांडुरंग मांजरेकर, प्रवीण खानदेशी, मीन त्रिवेदी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य केले.





























































