
देवेंद्र भगत
तलावांत समाधानकारक पाणीसाठा जमा झाल्यामुळे 5 ऑगस्टपासून सुरू असलेली 20 टक्के पाणीकपात रद्द करून 10 टक्के करण्यात आली आहे. ही आनंदाची बातमी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांत सध्या 12,32,302 दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा आहे. हे पाणी आजपासून पुढील 325 दिवस म्हणजेच पुढील 11 महिने पुरेल इतके आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास ऑगस्ट महिन्याच्या शेवटापर्यंत मुंबईला पाणी पुरवठा करणारे सगळे तलाव ओसंडून वाहायला लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई शहरासाठी जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात तलावांपैकी एक असलेला मोडकसागर तलाव 17 ऑगस्टच्या रात्री 9.24 वाजता ओसंडून वाहू लागला होता. गतवर्षी हा तलाव 26 जुलै 2019 रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी दिनांक 15 जुलै 2018 रोजी ओसंडून वाहू लागला होता. ह तलाव ओसंडून वाहायला लागल्यानंतर मुंबईतील पाणीकपात कमी केली जाणार असा अंदाज वर्तवला जात होता.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3,800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये या वर्षी जून, जुलैमध्ये कमी पाऊस झाल्याने ऑगस्टच्या सुरुवातीला केवळ 35 टक्केच पाणी जमा झाले. त्यामुळे मुंबईत 20 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. दरम्यान, 2019 मध्ये याच दिवशी 13 लाख 67 हजार 061 दशलक्ष लिटर म्हणजेच 94.45 टक्के पाणी जमा होते. तर या वर्षी 11 लाख 44 हजार 672 दशलक्ष लिटर म्हणजेच 79.09 टक्के पाणी जमा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 टक्के कमी पाणीसाठा आहे. मात्र, सध्या तलावक्षेत्रात सुरू असलेला पाऊस पाहता लवकरच तलाव सरासरी गाठतील आणि पाणी कपात मागे घेण्याची शक्यता पालिका प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.
आता केवळ 3,02,691 दशलक्ष लीटरची गरज
मुंबईकरांना वर्षभर पुरेसे पाणी मिळण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी सातही धरणांत मिळून 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. मात्र या वर्षी जून-जुलैमध्ये तलाव क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने खबरदारी म्हणून 5 ऑगस्टपासून 20 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. सोमवारी सकाळपर्यंत सात तलावांमध्ये 11 लाख 44 हजार 672 दशलक्ष लीटर्स पाणी जमा झाले होते. त्यामुळे आता केवळ 3 लाख 2 हजार 699 दशलक्ष लीटर्सची आवश्यकता आहे.



























































