
सामना ऑनलाईन । मुंबई
आयपीएलमध्ये उद्या तीन वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्स संघ दिल्ली कॅपिटल्सला घरच्या मैदानावर भिडणार आहे. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱया या लढतीत जसप्रीत बुमराह व हार्दिक पांडय़ाच्या खेळावर तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असणार आहेत. रोहित शर्मा व श्रेयस अय्यर या दोन मुंबईकरांच्या नेतृत्वाचाही या लढतीत कस लागेल हे निश्चित. वर्ल्ड कपआधी दुखापत होऊ नये यासाठी प्रत्येक संघातील खेळाडू आयपीएलमधील काही सामन्यांमधून विश्रांती घेतील यात शंका नाही.
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडय़ाला गेल्या सहा महिन्यांत दोन वेळा दुखापतीचा सामना करावा लागलाय. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्या फिटनेसवर अधिक लक्ष देण्यात येणार आहे, असे मुंबई इंडियन्स संघाचे संचालक झहीर खान यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. तसेच लसिथ मलिंगा पहिल्या सहा सामन्यांत खेळणार नसल्यामुळे जसप्रीत बुमराहवरही सुरुवातीच्या लढतींमध्ये दबाव असणार आहे.
युवराज, पोलार्ड दे दणादण फटकेबाजी करणार…
मुंबई इंडियन्समध्ये स्टार खेळाडूंचा भरणा आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मासह कायरॉन पोलार्ड, युवराज सिंग यांचा समावेश आहे. कायरॉन पोलार्ड व युवराज सिंग उद्या मुंबईकर क्रिकेटप्रेमींना आपल्या ‘दे दणादण’ फटकेबाजीने मंत्रमुग्ध करतील का, याचे उत्तर लवकरच मिळेल. बेन कटिंग, सूर्यकुमार यादव, कृणाल पांडय़ा, मयांक मार्कंडे यांच्याकडूनही चमकदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे.
पाहुणे देणार कडवी झुंज
दिल्ली कॅपिटल्सचा संघ मुंबई इंडियन्सला कशी टक्कर देतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे. पाहुण्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघात श्रेयस अय्यरसह शिखर धवन, ट्रेंट बॉल्ट, अमित मिश्रा, रिषभ पंत, कॅगिसो रबाडा, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर दोन संघांमध्ये होणारी ही झुंज रोमहर्षक होईल यात वाद नाही.
विल्यमसनच्या अनुपस्थितीत भुवी करणार नेतृत्व
2018 सालात हिंदुस्थानी संघाकडून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या भुवनेश्वर कुमारला यंदाच्या आयपीएल हंगामात बढती मिळाली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे. कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार संघाचे नेतृत्व करणार आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व हे ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरकडे होते, मात्र बॉल टॅम्परिंग प्रकरणात घालण्यात आलेल्या बंदीच्या शिक्षेनंतर मागच्या हंगामात केन विल्यमसनने संघाचे नेतृत्व केले. सनरायझर्स हैदराबादसमोर उद्या सलामीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान असणार आहे.
आजच्या लढती
कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद कोलकाता सायंकाळी 4 वाजता
मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स मुंबई रात्री 8 वाजता


























































