
वानखेडेच्या पाटा खेळपट्टीवर दुसर्या दिवशी मुंबईच्या गोलंदाजांचा बॉलबाला दिसल्यामुळे विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत गुंडाळून यजमानांनी आपल्या 42 व्या रणजी करंडकावर आपली पकड मजबूत केली. विदर्भाचा 105 धावांत खुर्दा पाडल्यामुळे 119 धावांची आघाडी घेणार्या मुंबईला कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुशीर खान यांनी वैयक्तिक अर्धशतकांसह तिसर्या विकेटसाठी केलेल्या 107 धावांच्या अभेद्य भागीमुळे संघाची आघाडी 260 वर नेली आहे. दुसर्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अजिंक्य 58 तर मुशीर 51 धावांवर खेळत होता.
काल रणजी करंडकाच्या पहिल्या दिवशी मुंबईचा डाव 224 धावांत गुंडाळल्यामुळे विदर्भाचा गोटात आनंदाचे वातावरण होते. मात्र आपली निरोपाची कसोटी खेळत असलेल्या धवल कुलकर्णीने आघाडीवीरांना बाद करत विदर्भाची 3 बाद 31 अशी दुर्दशा केली होती. त्यामुळे दुसर्या दिवसाचे सत्र दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते आणि तेच ठरले. कुलकर्णीच्या कालच्या दोन हादर्यांनतर आज सकाळचा पहिला धक्काही त्याचाच चेंडूने दिला. त्याने विकेटची बोहणी केल्यानंतर मुंबईचे गोलंदाज विदर्भाच्या फलंदाजांवर अक्षरशा तुटून पडले.
पहिल्या सत्रातच विदर्भाचे काम तमाम
कुलकर्णीने सलामीवीर तायडेला आपली खेळी फार मोठी करूच दिली नाही. कालच्या धावसंख्येत अवघ्या दोन धावांची भर पाडल्यानंतर कुलकर्णीने त्याला यष्टिमागे हार्दिककडे झेल देण्यास भाग पाडले. मग आदित्य ठाकरे आणि यश राठोड यांनी 40 धावांची भागी रचत विदर्भाला चांगली सुरुवात करून दिली होती. ही जमलेली जोडी शम्स मुलाणीने फोडली आणि सामन्याचा सारा रंगच बदलला. त्यानंतर पाहुण्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. 4 बाद 79 अशी स्थितीत असलेला विदर्भ शम्स मुलाणी आणि तनुष कोटियनच्या फिरकीपुढे 105 धावांतच गडगडला. दोघांनी 25 धावांत 6 विकेट घेत विदर्भाला उपाहाराआधीच तंबूत धाडण्याचा पराक्रम केला. कोटियनने तर आपल्या 4.3 षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या 7 धावा देत शेवटचे तीन फलंदाज बाद केले. मुलाणीने 32 धावांत 3 तर कुलकर्णीने 15 धावांत 3 विकेट टिपले.
अजिंक्यला सूर गवसला
यंदाच्या रणजी मोसमात आपला हरवलेला सूर अखरे अजिंक्य रहाणेला जेतेपदाच्या लढतीत गवसला. दुसर्या डावातही मुंबईच्या फलंदाजांनी निराशा केली. या मोसमात मुंबईचे आघाडीवीर वारंवार अपयश ठरत असल्यामुळे संघात चिंतेचे वातावरण असताना आजही त्याचीच भर पडली. पृथ्वी शॉ (11) आणि भूपेन लालवानी (18) यांची दमदार सलामी आजही मुंबईच्या पदरी पडली नाही. यश ठाकूरने पृथ्वीचा त्रिफळा उडवताच मुंबईच्या काळजात धस्सं झाले. पुढे भूपनेही हर्ष दुबेचा बळी ठरला. त्यामुळे 2 बाद 34 अशा बिकट अवस्थेत असलेल्या मुंबईला अजिंक्य रहाणेने आधार दिला. त्याने नवोदित मुशीर खानच्या साथीने मुंबईला सावरलेच नाही तर विदर्भच्या गोलंदाजांना आणखी यश मिळवू दिले नाही. त्याने या मोसमातील 0, 0,16, 8,9,1,ना.56, 22, 3, 0, 7 या भयानक खेळीनंतर दुसरे अर्धशतक पूर्ण केले.
दोघांनी शेवटचे सत्र यशस्वीपणे खेळून काढत मुंबईची धावसंख्या 141 पर्यंत नेली. दिवसअखेर मुंबईने आपली एकूण आघाडी 260 पर्यंत नेल्यामुळे मुंबई दुसर्या डावात मोठी धावसंख्या उभारून आपल्या 42 व्या रणजी जेतेपदावर मोठ्या विजयासह शिक्कामोर्तब करणार असल्याचे संकेत दुसर्याच दिवशी मिळाले आहेत. फक्त तिसर्या दिवशी मुंबईची आघाडी 400 की 500 चा टप्पा गाठते हे महत्त्वाचे आहे.




























































