
सामना ऑनलाईन । मुंबई
‘तुमच्यामुळेच आम्ही या देशात सुरक्षित आहोत’. ‘सैनिकांनो, आम्हाला तुमचा अभिमान आहे’, ‘धन्यवाद सैनिकहो’, ‘देशवासीयांना वाचवणे हेच त्यांचे ध्येय’, अशी पत्रं पाठवून मुंबईकर विद्यार्थ्यांनी ‘सीआरपीएफ’ जवानांच्या शौर्याला सलाम केला आहे. सीमेवर देशासाठी लढणारे जवानही या पत्रांनी भारावून गेले.
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे केलेल्या भ्याडहल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर देशवासीयांच्या सुरक्षेसाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा आपल्याला अभिमान आहे हा कृतज्ञतेचा संदेश देण्यासाठीच ‘सीआरपीएफ’ जवानांना मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पत्रं पाठवल्याचे सीआरपीएफचे जम्मूमधील जनसंपर्क अधिकारी आशीष कुमार झा यांनी यांनी सांगितले. स्वतःच्या कुटुंबापासून दूर सीमेवर असलेल्या जवानांमुळे आम्ही देशात सुरक्षित असतो; मात्र दहशतवादी हल्ल्यासारख्या घटनांमुळे आम्हालाही सैनिकांच्या सुरक्षेची काळजी लागून राहिलेली असते, अशी भावनाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
तिरंगा, हिंदुस्थान आणि अभिमान!
मुंबईतील विद्यार्थ्यांनी जम्मू आणि कश्मीरमधील जवानांना पाठवलेल्या शुभेच्छा पत्रांवर हिंदुस्थानचा तिरंगा झेंडा, देशाचा नकाशा आणि सैनिकांचा अभिमान सांगणारी घोषवाक्ये लिहिण्यात आली आहेत. सीआरपीएफच्या जवानांनी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पाठवलेली शुभेच्छापत्रे सीमेवरील सैनिकांच्या अनेक तुकडय़ांमध्ये पाठवली आहेत. त्यामुळे ही शुभेच्छापत्रे जवानांसाठी नक्कीच प्रेरणादायी आणि स्फूर्ती देणारी ठरतील असा विश्वास ‘सीआरपीएफ’कडून व्यक्त करण्यात आला.



























































