‘मुंबई’नगरी बडी बांका गं!!!

>> वृषाली परब

मुंबई शहराचे आकर्षण सर्वांनाच आहे. या मुंबई नगरीचे वैभव सर्वस्वी आगळे आणि सर्वांनाच खुणावणारे आहे. कष्टकरी हातांना काम व रोजगार मिळवून देणारी, शून्यातून विश्व साकारणाऱया अनेक धुरंधरांना नाव आणि प्रतिष्ठा मिळवून देणारी अशी मुंबापुरीची ख्याती आहे. संजीव पाध्ये यांचे मुंबईचे गुणवैशिष्टय़, स्थान-माहात्म्य आणि अस्सल मुंबईकर यांचा वेध घेणारे पुस्तक नुकतेच ‘माझी मुंबापुरी’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. मुंबईवर प्रेम करणारी मंडळी आणि अभ्यासक या दोहोंच्या गरजा भागवणारे हे पुस्तक आहे.

या पुस्तकामध्ये मुंबईविषयक विविध लेखांचा संग्रह आहे. याद्वारे नगरीची रंजक व रोचक माहिती वाचायला मिळते. इतिहास, स्थळे, वारसा, व्यक्ती अशा विभागांमध्ये या लेखांची विभागणी करण्यात आली आहे. मुंबादेवी मंदिर, दादर चौपाटीनजीकचे ज्ञानेश्वर मंदिर, ब्रेबॉर्न स्टेडियम, ऑपेरा हाऊस, पाटकर कॉलेज, आर.एम. भट शाळा, रेल्वे स्टेशनमधील अनाऊन्सर तसेच नाना शंकरशेठ, बॅरिस्टर जीना, बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांच्याविषयीची वेगळी रंजक माहिती यात आहे. बाळासाहेब बरीच वाद्ये वाजवत असत किंवा पूज्य बाबासाहेबांचा हसरा फोटो मिळवण्यासाठी एका अवलियाने केलेली धडपड, मुंबईला क्रिकेटची पंढरी का समजली जाते याचा वेध घेणारा अभ्यासपूर्ण प्रदीर्घ लेख, कोळी आणि त्यांची गाणी, बटाटेवडा आदी अनेक वाचनीय लेख या पुस्तकाचे संदर्भमूल्य वाढविणारे आहेत. ‘माझी मुंबापुरी’ या पुस्तक लेखनाच्या माध्यमातून मुंबई नगरीला समृद्ध करणाऱया अनेकविध क्षेत्रांचा मागोवा घेण्याचा लेखकाचा प्रयत्न झक्कास जमून आलाय.

माझी मुंबापुरी
लेखिका – संजीव पाध्ये
प्रकाशक – नवचैतन्य प्रकाशन, मुंबई,
पृष्ठ – 176, मूल्य – रुपये 240/-

आपली प्रतिक्रिया द्या