डुप्लिकेट चावी बनवून महिलेचा मुंब्र्यातील घरावर दरोडा, 35 लाखांचे सोने लुटणाऱ्या महिलेला सिनेस्टाईल अटक

डुप्लिकेट चावी बनवून तळोजात राहणाऱ्या एका महिलेने मुंब्र्यातील घरावर दरोडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेने घरातील ३५ तोळे सोन्याचे दागिने व २० हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. पोलीस घराचा पंचनामा करत चक्रावून गेले. चोरट्याने घराचे कुलूप न तोडता तसेच कोणतीही तोडफोड न करता चोरी केली होती. कोणतेही पुरावे नसल्याने या चोरट्याच्या मुसक्या आवळणे म्हणजे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले होते. मात्र मुंब्रा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अवघा आठ तासांत चोरट्या महिलेला सिनेस्टाईल अटक केली. सानिया बेग (२९) असे चोरट्या महिलेचे नाव आहे.

मुंब्र्यातील बिलाल हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या हिना सज्जादअली सुर्वे (४६) या महिला तन्वरअली नगर येथे राहणाऱ्या त्यांच्या आईच्या घरी राहण्यासाठी गेल्या होत्या. तेथून त्या घरी आल्यानंतर त्यांना घरातील दागिने आणि पैसे चोरी झाल्याचे लक्षात आले. मात्र घर लॉक असल्याने चोर चोरी कसा करू शकतो या संभ्रमात त्या पडल्या.

अखेर त्यांनी मुंब्रा पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. सुरुवातीला पोलीसही या घटनेमुळे थक्क झाले. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक माने यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपवली. माने यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, तांत्रिक यंत्रणा व मोबाईल स्ट्रेसिंगच्या मदतीने तळोजा गाठले आणि सानिया बेगला बेड्या ठोकल्या. तिने या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करत चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला.

भिवंडीत भरदिवसा घरफोडी

घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केल्याची घटना जुना गौरीपाडा परिसरात घडली. या घटनेत चोरट्यांनी अफिपा बानो शेख यांच्या घरातील नऊ लाखांचे दागिने लांबवले आहेत. शेख या सकाळी आपल्या कुटुंबीयांसोबत ठाणे येथील नातेवाईकाकडे गेले होते. दुपारी तीन वाजता त्या घरी परतल्यानंतर चोरट्यांनी घर फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी अफिपा बानो यांनी चोरट्यांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.