
लसीकरण मोहीम अधिक वेगवान बनवण्यासाठी मुंबई महापालिकेने आता सोसायटय़ा, बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि चौपाटय़ांवर फिरत्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. पालिकेच्या के-पश्चिम विभागापासून याची नुकतीच सुरुवात झाली असून यामुळे 50 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण असलेला हा विभाग लवकरच 100 टक्के लसीकरणाकडे वाटचाल सुरू करेल, अशी माहिती के-पश्चिमचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांनी दिली.
कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून त्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. त्यामुळेच राज्य सरकार आणि महापालिकेने निर्बंध शिथिल केले असून सर्वसामान्य जनजीवन सुरळीत सुरू आहे. अधिकाधिक मुंबईकरांचे लसीकरण व्हावे यासाठी महापालिका विशेष लसीकरण मोहिमा राबवत आहे. यात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण वाढावे यासाठी महिलांसाठी विशेष लसीकरण, लसीचा दुसरा डोस घेणाऱयांसाठी तसेच फेरीवाले, तृतीयपंथी, शरीरविक्रय करणाऱया महिला, बेघर, आदिवासी, आधारकार्ड नसलेल्या व्यक्ती, कैदी यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत. त्याला विविध स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षांकडून सुरू असलेल्या दोन-दोन दिवसांच्या विशेष लसीकरणाचीही जोड मिळत आहे. सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत ही विशेष मोहीम राबवली जात आहे.
पाच परिसरांसाठी एक फिरते पथक
मुंबई महापालिकेच्या के पश्चिम अंधेरी पश्चिम विभागात येणाऱया जुहू, विलेपार्ले पश्चिम, वर्सोवा, लोखंडवाला, जोगेश्वरी पश्चिम, ओशिवरा या परिसरात फिरती लसीकरण मोहीम राबवली जात आहे. पालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल, के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पामपटवार यांच्या उपस्थितीत नुकतीच याची सुरुवात झाली. या विभागात महानगरपालिकेची 27 तर खासगी 12 खासगी लसीकरण केंद्रे सुरू असून त्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. के-पश्चिम विभागाची एकूण लोकसंख्या साधारणतः 8 लाख 35 हजार 328 इतकी असून 18 वर्षांवरील लोकसंख्या साधारणतः 6 लाख 68 हजार 262 इतकी आहे. यापैकी साधारणतः 95 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे व 50 टक्क्यांच्या वर दुसरा डोस घेतला आहे.

























































