मुंब्रा खाडी पुलाच्या कामाला वेग, मध्य रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

लांबपल्ल्याच्या गाडय़ांना स्वतंत्रपणे शहराबाहेर काढण्यासाठी मुंब्रा खाडीत ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी एलिवेटेड (उन्नत) मार्ग बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरून लांबपल्ल्याच्या गाड्या धावणार असल्याने उपनगरीय लोकलच्या सेवेतील अडथळे दूर होणार आहेत. त्यामुळे लोकलच्या किमान शंभर फेऱया वाढविणे शक्य होणार असून चाकरमान्यांना कल्याण ते मुंबई प्रवास वेगवान आणि बसून करता येणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) ठाणे ते दिवा पाचवा व सहावा मार्ग बांधत आहे. हा मार्ग सध्याच्या मध्य रेल्वेच्या धीम्या अप आणि डाऊन मार्गाच्या शेजारून नेण्यात येत आहे. येथे बोगद्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मुंब्रा स्थानकाच्या शेजारील खाडीतून हा मार्ग एलिवेटेड नेण्यात येणार असल्याने येथील मॅनग्रोव्हच्या पट्टय़ांचा अडथळा येत होता. परंतु आता पर्यावरणासह सर्व यंत्रणांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे खाडीमध्ये उन्नत पूल बांधण्याचे काम वेगाने होत असून येत्या दोन वर्षांत हे काम पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

कल्याण ते कुर्ला विनाअडथळा प्रवास
कल्याण ते दिवा पाचवा व सहावा मार्ग तयार असून मधला ठाणे ते दिवा या 9 कि.मी.च्या मार्गाचे काम तेवढे शिल्लक राहिले आहे. पुढे ठाणे ते कुर्ला अशी पाचवी आणि सहावी मार्गिकाही तयार झाली आहे. त्यामुळे ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका तयार झाल्यास कल्याण ते थेट कुर्ला अशी पाचवी व सहावी मार्गिका लांबपल्ल्याच्या गाडय़ासाठी वापरली जाईल. त्यामुळे उपनगरीय गाडय़ांना होणारा लांबपल्ल्याच्या गाडय़ांचा अडथळा दूर होईल. उपनगरीय लोकलसाठी स्वतंत्र कॉरिडॉर उपलब्ध होऊन लोकलच्या फेऱ्या वाढविण्याबरोबरच कार्यक्षमतेतही वाढ होणार आहे.

कुर्ला हार्बर स्थानक एलिवेटेड
कुर्ला येथे हार्बरचे सध्याचे फलाट क्र. 7 आणि 8 लांबपल्ल्याच्या गाडय़ांसाठी (पाचवी आणि सहावी मार्गिका) वापरले जाणार आहेत. तर हार्बरचे कुर्ला स्थानक एलिवेटेड होणार आहे. चुनाभट्टी-कुर्ला येथील कसाईवाडा पादचारी पुलापासून सुरू होणारा हा 1120 मीटरचा एलिवेटेड मार्ग टिळक नगर स्थानकाजवळ पुन्हा जमिनीवर येऊन जोडला जाणार आहे. तसेच येथून पोर्ट ट्रस्टची कुर्ला ते वडाळा ही तिसरी मार्गिकाही जाणार आहे.

परळ ते सीएसएमटी अधांतरी
परळ रेल्वे कारखान्याच्या जागेवर लांबपल्ल्यांच्या गाडय़ांसाठी परळ टर्मिनस बांधण्यात येणार आहे. हे महत्त्वाचे काम पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसोबतच होणार आहे. मात्र कुर्ला-परळ आणि परळ ते सीएसएमटी असे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम अधांतरी आहे. हा मार्ग परळपर्यंतच संपविण्यात येणार असून जमिनीच नसल्याने केवळ पाचवी मार्गिका तयार करण्याची योजना असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

एमयूटीपी-3 गरजेचा
कल्याण ते आसनगाव 4 था मार्ग आणि कल्याण ते बदलापूर 3 आणि 4थी लाइन बांधण्याची योजना एमआरव्हीसीने एमयूटीपी-3नुसार आखली आहे. या योजनेला कॅबिनेटची मंजुरीही मिळाली आहे. हे मार्ग पूर्ण झाल्यावर कल्याणच्या पुढील प्रवाशांना फायदा होणार आहे.