पालिकेच्या स्वीमिंग पुलांची दुरवस्था सुधारा- शिवसेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या तरण तलावांत मध्यमवर्गीय लोक आणि त्यांची मुले येत असतात, मात्र त्यांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत. पालिकेच्या अनेक तरण तलावांची दुरवस्था झाली आहे. तेथील शॉवर बंद आहेत, खिडक्यांची तावदाने तुटली आहेत, स्वच्छतागृहांच्या दरवाजांना कडय़ा नाहीत. त्यामुळे मुंबईतील सगळ्या तरण तलावांचे टप्याटप्प्याने आधुनिकीकरण (अपग्रेडेशन) करावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. मुलुंडमधील तरण तलावात काल झालेल्या क्लोरीन वायुगळतीवरून गुरुवारी महासभेत शिवसेनेसह सगळ्या पक्षांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. त्यावेळी मुंबईतील तरण तलावांच्या दुरवस्थेबाबत मुद्दा शिवसेनेने उपस्थित केला.

मुलुंडच्या प्रियदर्शिनी तरण तलाव परिसरात संध्याकाळी क्लोरिनची गॅसगळती झाली. त्यामुळे सुरक्षारक्षक, कर्मचाऱयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याचे पडसाद महासभेत उमटले. यावरून मुलुंडसह मुंबईतील तरण तलावांच्या स्तिथीबद्दल सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. मुलुंडमधील तरण तलावात झालेली वायुगळती पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि उदासीनतेमुळे झाली आहे. या तरण तलावाच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षेसाठी काय उपाययोजना आखल्या आहेत, ही वायुगळती कशी झाली याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विशाखा राऊत यांनी केली.

फी मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर
पालिकेच्या तरण तलावांत मध्यमवर्गीय लोक येत असतात, पण पालिकेच्या तरण तलावांची फी अवाच्यासवा आहे. वर्षाला 8 हजार रुपये फी आकारली जाते. दरवर्षी यात 10 टक्के वाढ केली जाते. जर एकाच घरातील एकापेक्षा जास्त लोकांना पोहायला जायचे असेल तर त्यांना ते परवडणारे नाही. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि फी कमी करण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात, असेही विशाखा राऊत म्हणाल्या.